पलूस प्रतिनिधी : गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली बुर्ली गावातील एसटी बस सेवा तात्काळ सुरू करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पलूस-कडेगावचे नेते प्रदीप (आप्पा) कदम यांच्या नेतृत्वाखाली बुर्लीचे युवा नेते राहुल पाटील यांनी आगार व्यवस्थापक कोळी साहेब यांना निवेदन दिले. यावेळी आगार व्यवस्थापकांनी येत्या दोन ते तीन दिवसांत बुर्ली गावातील एसटी बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले.
गेल्या दोन वर्षांपासून एसटी बस सेवा बंद असल्याने बुर्ली व परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावातील नागरिकांना तालुका तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असल्याने वेळ आणि आर्थिक खर्च वाढत आहे.
बुर्ली गावातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाची गरज लक्षात घेऊन बंद असलेली एसटी बस सेवा तातडीने पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागणीची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी दोन ते तीन दिवसांत बससेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
निवेदन देताना रामानंदनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमीर भैय्या पठाण, पलूसचे नेते उल्हास पाटील, अंकुश गस्ते, विकी भैय्या तातुगडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या