प्रतिष्ठा न्यूज
पलूस प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप (आप्पा) कदम यांच्या वाढदिवसानिमित्त पलूस तालुक्यात बुधवारी विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. वाढदिवस केवळ शुभेच्छा स्वीकारून साजरा न करता समाजातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गरजू आणि विशेष मुलांसाठी उपयोगी ठरणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधीलकी जपण्यात आली.
दिवसाची सुरुवात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर अंकलखोप येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिस्मारकास भेट देऊन स्वच्छता करण्यात आली. स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर अंकलखोप येथील जिजामाता बालक मंदिराला भेट देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रदीपआप्पा कदम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांसमवेत अभिष्टचिंतन सोहळाही उत्साहात पार पडला. हा उपक्रम आशितोष पाटील मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
त्यानंतर भिलवडी येथील प्राचीन शिवमंदिरात अभिषेक व पूजा करण्यात आली. धार्मिक कार्यक्रमानंतर आष्टा येथील आधार वृद्धाश्रमास भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
बुर्ली येथे राहुल पाटील मित्र परिवाराच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरास प्रदीपआप्पा कदम यांनी भेट दिली. परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
पलूस कॉलनी येथील अभिनव विशेष मुलांची शाळा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपयोगासाठी भांड्यांचा संच भेट देण्यात आला. विशेष विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे त्यांच्या गरजांना थेट हातभार लागला.
प्रदीपआप्पा कदम यांची जन्मभूमी असलेल्या बांबवडे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व २ मध्ये विद्यार्थ्यांसाठी वॉटर प्युरिफायरचे लोकार्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यानंतर येळावी येथील गोविंद वृद्धसेवा आश्रमात बैठक व्यवस्थेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच आश्रमातील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
रामानंदनगर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भव्य पुस्तक तुला सोहळा आयोजित करण्यात आला. या माध्यमातून जमा झालेली स्पर्धा परीक्षा व अभ्यासाची पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक साहित्य मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. याच ठिकाणी चित्रकला स्पर्धा व भव्य रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले.
दिवसभर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय, पलूस येथे प्रदीपआप्पा कदम यांनी नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. रात्रीपर्यंत विविध ठिकाणांहून आलेल्या नागरिकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पाणी, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, विशेष मुलांसाठी खाऊ व भांड्यांचा संच, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, तसेच नागरिकांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी अशा विविध उपक्रमांचा समावेश होता.
वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा स्वीकारण्यापेक्षा समाजातील विविध घटकांच्या गरजा ओळखून त्यासाठी प्रत्यक्ष उपयोगी उपक्रम राबविण्यात आल्याने प्रदीपआप्पा कदम यांचा वाढदिवस सामाजिक बांधीलकी आणि लोकसेवेचा जागर ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या