प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:शहरातील सांगली नाका ते कॉलेज कॉर्नर या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे.रस्त्यावरून प्रवास करताना खड्डे चुकवायचे,वाहनाचा तोल सांभाळायचा आणि समोरून येणाऱ्या वाहनांपासून बचाव करायचा,अशा तारेवरच्या कसरतीतून नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे.त्यामुळे तासगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘खड्डा चुकवा अन् बक्षीस मिळवा’ अशी एखादी अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे काय? असा उपरोधिक सवाल नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.रस्ते हे नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी असतात की वाहनचालकांच्या कौशल्याची परीक्षा घेण्यासाठी,असा प्रश्न या मार्गावरील परिस्थिती पाहून पडत आहे. दुचाकीस्वारांना खड्ड्यांचा अंदाज घेत वाहन चालवावे लागत असून, अचानक खड्डा समोर आल्यास अपघाताचा धोका निर्माण होत आहे.चारचाकी वाहनचालकांनाही खड्डे चुकवताना कसरत करावी लागत आहे. विशेषतः या मार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी ही परिस्थिती बनली आहे.
खड्डे रस्त्यावर,जबाबदारी मात्र हवेत!
रस्त्यांची दुरवस्था झाल्यानंतर संबंधित यंत्रणा नेमकी कधी जागी होणार, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. नागरिकांना चांगले रस्ते मिळणे ही अपेक्षा नसून मूलभूत गरज आहे. मात्र, सांगली नाका ते कॉलेज कॉर्नरदरम्यानची परिस्थिती पाहता, या गरजेकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.खड्डे पडल्यावर त्यांची तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित असताना, नागरिकांना खड्डे चुकवत प्रवास करण्याची वेळ येत असेल, तर संबंधित विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. पावसामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली असेल, तरीही नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी झटकता येणार नाही.
*बक्षीस नको, खड्डेमुक्त रस्ता द्या!*
सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन सांगली नाका ते कॉलेज कॉर्नरदरम्यानच्या रस्त्याची पाहणी करावी आणि खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.‘खड्डा चुकवा अन् बक्षीस मिळवा’ ही स्पर्धा प्रत्यक्षात नसली, तरी रस्त्यावरील परिस्थितीने नागरिकांना तसाच अनुभव येत आहे. त्यामुळे आता आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष कामाची गरज आहे. संबंधित विभागाने वेळीच दखल घेऊन रस्ता सुरक्षित करावा; अन्यथा या मार्गावरील खड्डे आणि प्रशासनाची उदासीनता हाच चर्चेचा विषय राहणार, हे निश्चित!
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या