गगनबावडा : आसगाव ते गगनबावडा रस्ता विकासाच्या कामात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य व रास्त मोबदला मिळावा, तसेच या रस्त्याचे काम दर्जेदार आणि स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांना त्रास न देणारे व्हावे, या प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापूरचे माननीय जिल्हाधिकारी विजय राठोड साहेब यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गगनबावडा अध्यक्ष, युवा जिल्हाध्यक्ष (गुरव समाज, कोल्हापूर) तथा शेणवडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रकाश पाटील यांच्या पुढाकाराने आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
१. योग्य मोबदला: रस्ता रुंदीकरणात आणि विकासात जाणाऱ्या शेतजमिनींचा योग्य आणि नुकसान भरपाई देणारा मोबदला शेतकऱ्यांना तातडीने मिळावा.
२. असळज बाजारपेठेतूनच रस्ता जावा: असळज येथील स्थानिक व्यापाऱ्यांचे आणि नागरिकांचे हित लक्षात घेऊन रस्ता असळज बाजारपेठेतूनच नेण्यात यावा.
३. पाईपलाईन बदलून देणे: रस्त्याच्या कामात बाधित होणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन ठेकेदाराने स्वतःच्या खर्चाने बदलून द्याव्यात, जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न निर्माण होणार नाही.
४. शेतीचे रस्ते व अनावश्यक भराव: शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यासाठीचे रस्ते सुस्थितीत करून द्यावेत. तसेच रस्त्याच्या कामात गरज नसलेला अनावश्यक भराव कमी करून कामाचा दर्जा उत्तम ठेवावा.
५. पर्यटनास चालना (शेणवडे कटेसावर): शेणवडे येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या प्रसिद्ध 'दोन फुलांची काटेसावर' पाहण्यासाठी पर्यटकांना सोयीचे ठरेल असा जवळचा रस्ता विकसित करण्यात यावा.
यावेळी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या आणि स्थानिकांच्या रास्त मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्वरित योग्य ती कारवाई करावी, अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली.
महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती:
या प्रसंगी गगनबावडा पंचायत समितीच्या सभापती सौ. छाया प्रकाश देसाई, जिल्हा परिषद सदस्या सोनाली पाटील, संभाजी पाटणकर, मार्गदर्शक जोसेफ जे. बारदेस्कर , माजी सभापती चंद्रकांत खानविलकर, उपसभापती राजेश पाटील, पंचायत समिती सदस्य अमर कांबळे, साळवणचे सरपंच योगेश काटकर, माजी सरपंच बाबासो पडवळ, प्रकाश मोहिते यांच्यासह परिसरातील बाधित शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या