विजयपूर : ‘विजयपूरमध्ये भाजप संपला आहे,’ अशी टीका करणारे विजयपूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी ज्या भाजपच्या चिन्हावर निवडून आले, त्या पक्षाची ताकद विसरू नये. स्वतःच्या बळावर निवडून येण्याची ताकद असल्याचा विश्वास असेल तर त्यांनी तातडीने आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी.
भाजप एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन त्यांच्याविरोधात निवडणूक लढवेल आणि पक्षाची ताकद काय आहे, हे दाखवून देईल, असे खुले आव्हान भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष परशुरामसिंग रजपूत यांनी दिले.
यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या पत्रकात रजपूत यांनी म्हटले आहे की, भाजपच्या माध्यमातूनच केंद्रात मंत्री, आमदार आणि खासदार म्हणून यत्नाळ यांची राजकीय कारकीर्द घडली. मात्र, आता ते त्याच पक्षावर टीका करीत आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवरही ते टीका करीत आहेत. पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतरही त्यांची पक्षविरोधी वक्तव्ये थांबलेली नाहीत. भाजपने त्यांना राजकारणात सर्व काही दिले असताना त्याच पक्षाबद्दल अशा प्रकारे बोलणे कितपत योग्य आहे, असा सवाल रजपूत यांनी केला.
विजयपूरमध्ये भाजपची संघटना मजबूत
विजयपूर जिल्ह्यात भाजपची संघटना मजबूत असून, यत्नाळ यांच्यासारखे ‘तडजोडीचे राजकारण करणारे’ नेते बाजूला झाल्यानंतर पक्ष आणखी बळकट झाला आहे, असा दावा रजपूत यांनी केला. ‘भाजप संपला’ असे म्हणण्यापूर्वी यत्नाळ यांनी पक्षाच्या कार्याकडे डोळसपणे पाहावे. नुकत्याच झालेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ यांसारख्या कार्यक्रमांत हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते नव्या संकल्पाने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यरत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
‘पूर्वीचा पराभव विसरलात का?’
तुमच्यात एवढीच ताकद असेल तर पूर्वी दुसऱ्या पक्षाकडून विजयपूर शहर मतदारसंघातून निवडणूक लढविल्यानंतर झालेला पराभव आठवा. त्यानंतर बी. एस. येडियुरप्पा यांची मनधरणी करून पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्याचेही विसरू नका, असा टोला रजपूत यांनी लगावला.
यत्नाळ यांनी तातडीने राजीनामा द्यावा त्यांच्याविरोधात पक्ष एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देईल आणि भाजपची ताकद दाखवून देईल. तसेच भाजपला बदनाम करणारी वक्तव्ये केल्याबद्दल यत्नाळ यांनी जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी परशुरामसिंग रजपूत यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या