प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : दि.तासगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीच्या हालचालींना आता वेग आला असून,व्हाईस चेअरमन अनिल कुत्ते यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने बँकेतील राजकीय व संचालकीय घडामोडींना नवे वळण मिळाले आहे.मात्र विद्यमान चेअरमन कुमार शेटे यांनी अद्याप राजीनामा दिलेला नसल्याने पुढील समीकरण काय असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.बँकेची निवडणूक सन २०२२ मध्ये झाली होती.त्यावेळी १२ संचालकांची बिनविरोध निवड झाली.त्यानंतर माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या पसंतीने महेश्वर हिंगमिरे यांची चेअरमनपदी,तर कुमार शेटे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली होती.सन २०२५ मध्ये संचालक मंडळाची संजयकाका पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर चेअरमन महेश्वर हिंगमिरे व व्हाईस चेअरमन कुमार शेटे यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. त्यानंतर ज्येष्ठ संचालक म्हणून कुमार शेटे यांच्याकडे चेअरमनपदाची, तर अनिल कुत्ते यांच्याकडे व्हाईस चेअरमनपदाची जबाबदारी देण्यात आली.दरम्यान,ही पदे काही कालावधीसाठी देण्यात आली असून त्यानंतर इतर संचालकांना संधी दिली जाईल,अशी चर्चा संचालकांमध्ये झाली असल्याचे सांगितले जात आहे.तसेच बँकेच्या संस्थापकांच्या नातवास पुढील टप्प्यात संधी देण्याबाबत शब्द दिल्याचीही चर्चा आहे.त्यामुळे आता हा शब्द पाळला जाणार का? पुढील चेअरमन-व्हाईस चेअरमन कोण? याकडे बँकेच्या वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर संजयकाका पाटील यांच्या समवेत संचालकांची बैठक झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या बैठकीस चेअरमन कुमार शेटे उपस्थित नसल्याचे सांगितले जात आहे. बैठकीनंतर व्हाईस चेअरमन अनिल कुत्ते यांनी बँकेचे व्यवस्थापक सगरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला.वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे कुत्ते यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.दरम्यान,चेअरमन कुमार शेटे यांना राजीनाम्याबाबत अद्याप कोणतीही सूचना नसल्याने त्यांनी राजीनामा दिलेला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनिल कुत्ते यांच्या राजीनाम्यानंतर कुमार शेटे यांची पुढील भूमिका काय राहणार आणि चेअरमनपदासाठी संजयकाका पाटील कोणाच्या नावाला पसंती देणार,याचीच चर्चा सध्या बँकेच्या संचालक वर्तुळात रंगली आहे.एकीकडे विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे चित्र असताना दुसरीकडे पुढील नेतृत्वासाठी कोणाला संधी मिळणार,यावरच तासगाव अर्बन बँकेच्या आगामी कारभाराचे समीकरण ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा संजयकाका पाटील यांच्या पुढील निर्णयाकडे लागल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या