प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:शासनाची जन्म-मृत्यू नोंदणीची वेबसाईट मागील अनेक दिवसांपासून ठप्प असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.जन्म किंवा मृत्यू दाखल्यासाठी अर्ज करूनही नागरिकांना महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागत असल्याची परिस्थिती सांगली जिल्ह्यातील विविध नगरपालिका कार्यालयांमध्ये पाहायला मिळत आहे.नियमानुसार अर्ज केल्यानंतर साधारण सात दिवसांत दाखला मिळणे अपेक्षित असताना, सध्या त्यासाठी महिना-दोन महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. शासकीय वेबसाईटचे सॉफ्टवेअर अपडेट तसेच नवीन योजनांसाठी आवश्यक ऑप्शन अपडेट करण्याचे काम सुरू असल्याने ऑनलाइन प्रक्रियेला विलंब होत असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे.
ऑनलाईन प्रक्रिया ठप्प; हेलपाटे कायम
जन्म-मृत्यू दाखला हा अनेक शासकीय योजना,शैक्षणिक कामे, वारसाहक्क, विमा, बँकिंग तसेच विविध प्रशासकीय प्रक्रियांसाठी आवश्यक असतो. मात्र वेबसाईट बंद असल्याने नागरिकांना ऑनलाइन अर्ज, पडताळणी आणि दाखला मिळण्याची प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. परिणामी संबंधित कार्यालयांमध्ये चौकशीसाठी नागरिकांचे वारंवार हेलपाटे सुरू आहेत.सॉफ्टवेअर अपडेटचे काम नेमके कधी पूर्ण होणार आणि नागरिकांना नियमितपणे दाखले कधी मिळणार, याबाबत स्पष्ट कालमर्यादा नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
*पालकमंत्र्यांनी वरिष्ठ पातळीवर दखल घ्यावी*
जन्म-मृत्यू दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी शासनाच्या संबंधित विभागाने तातडीने वेबसाईट सुरळीत करावी. जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी या प्रश्नाची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन तातडीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या