बुधगाव (प्रतिनिधी) : बुधगाव ग्रामपंचायत हद्दीतील सांगली–तासगाव रस्त्याच्या गटारीसह विविध अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा बुधगाव ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच वैशाली विक्रम पाटील व उपसरपंच अविनाश गोरख शिंदे यांनी दिला आहे.
बुधगाव ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या सांगली–तासगाव रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडले असल्याचा आरोप ग्रामपंचायतीकडून करण्यात आला आहे. रस्त्यालगतच्या गटारी व इतर कामे अपूर्ण अवस्थेत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह बुधगाव व परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, विजयादशमीच्या सुमारास सांगलीतील वसंतदादा साखर कारखाना सुरू होण्याची शक्यता असल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण न झाल्यास वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
बुधगाव गावातील विविध ठिकाणी रस्ते व गटारींची कामे अपूर्ण ठेवण्यात आल्याने नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाचे पाणी, वाहतुकीची वाढती वर्दळ आणि अपूर्ण गटारी यामुळे भविष्यात नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदाराने प्रलंबित असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी सरपंच वैशाली विक्रम पाटील, उपसरपंच अविनाश गोरख शिंदे, ग्रामपंचायत सदस्य तसेच बुधगावमधील विविध राजकीय संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.
कामे तातडीने पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन बुधगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ठेकेदाराची राहील, असेही यावेळी सांगण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या