प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : सरासरी ६५०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडणाऱ्या आणि 'पावसाचे आगार' मानल्या जाणाऱ्या गगनबावडा तालुक्यात यंदा पावसाने तब्बल ३७ टक्क्यांहून अधिक दांडी मारल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जूनपासून अपेक्षित ४९२६.६ मि.मी. पावसाऐवजी केवळ ३०९१.६ मि.मी. (६२.८ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.
खरीप पिकांवर संकट :
पावसाच्या तुटीमुळे तालुक्यातील १८४४ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके कोमेजू लागली आहेत. यात भात (१४८३ हेक्टर), नाचणी (२७३ हेक्टर), इतर तृणधान्ये आणि भुईमुगाच्या पिकांचा समावेश आहे. भात पीक सध्या पोटरीच्या व लोंबी बाहेर येण्याच्या नाजूक टप्प्यावर असतानाच पाऊस गायब झाल्याने तसेच विहिरी व ओढ्यांची पाणीपातळी खालावल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती असून शेतकरी चिंताक्रांत झाला आहे.
जलप्रकल्पांत मुबलक साठा :
दुसरीकडे, तालुक्यातील कुंभी मध्यम प्रकल्पासह (९९.७७%) कोदे, अणदूर व वेसरफ हे तिन्ही लघुपाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. कुंभी धरण क्षेत्रात ५३५८ मि.मी. पाऊस झाला असून पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून विसर्गही करण्यात आला आहे. धरणे भरलेली असली तरी पाऊस नसल्याने उर्वरित भागातील शेतीची स्थिती भयावह बनली आहे.
"अल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरी ८०० ते ९०० मि.मी. पाऊस कमी झाला आहे. तरीही तालुक्यातील सर्व प्रकल्प १००% भरले असून १५ जून २०२७ पर्यंत सिंचनाचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा."
— अजिंक्य पाटील (शाखाधिकारी, पाटबंधारे विभाग)


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या