प्रतिष्ठा न्यूज
सांगली, ता. २९ : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाकडून वापरले जाणारे निकष सदोष असून, प्रत्यक्ष शेतकऱ्यांची परिस्थिती आणि त्यांच्या व्यथा या निकषांमध्ये प्रतिबिंबित होत नाहीत. त्यामुळे ज्या निकषांच्या आधारे काही भाग दुष्काळग्रस्त घोषित केला जात आहे, त्याच निकषांचा फेरविचार करून तासगाव, खानापूर, पलूस, कडेगावसह सांगली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळी जाहीर करावेत, या मागणीसाठी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली अहिंसक मार्गाने ‘गांधीगिरी’ आंदोलन करण्यात येणार आहे.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी सांगलीतील स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हे जनआंदोलन करण्यात येणार असून, सांगली जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून या लढ्याची सुरुवात केली जाईल, अशी माहिती संजयकाका पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संजयकाका पाटील म्हणाले, “दुष्काळ जाहीर करताना शासनाकडून लावले जाणारे निकषच सदोष असतील, तर त्या निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार? शेतकऱ्यांचे अश्रू पाहा, त्यांचा आक्रोश ऐका आणि त्यांच्या शेतातील प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घ्या. हाच खरा दुष्काळाचा निकष मानला पाहिजे.”
पर्जन्यमापकांच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह
पावसाची नोंद आणि त्याआधारे दुष्काळाचे निकष निश्चित करण्याच्या पद्धतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. पर्जन्यमापक यंत्रणेत त्रुटी असून, अनेक ठिकाणी प्रत्यक्ष पाऊस आणि सरकारी आकडेवारी यामध्ये तफावत असल्याचा दावा त्यांनी केला.
“पावसाच्या आकडेवारीत कशी गडबड केली जाते, हे आम्ही पुराव्यानिशी यापूर्वी सादर केले आहे. अतिवृष्टीच्या वेळी विमा कंपन्यांना फायदा होईल, अशा पद्धतीने आकडेवारी मांडली जाते, असा आमचा आक्षेप आहे. आता दुष्काळाच्या बाबतीतही अशीच परिस्थिती निर्माण होत आहे. पर्जन्यमापक सदोष असतील, तर त्यावर आधारित दुष्काळाचे मूल्यांकन करणे योग्य नाही,” असे पाटील म्हणाले.
दुष्काळाचे मूल्यांकन करताना केवळ कागदोपत्री आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतशिवारातील परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा
२ ऑक्टोबरचे आंदोलन ही केवळ सुरुवात असून, शासनाने मागण्यांची दखल घेतली नाही तर पुढील काळात आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशारा संजयकाका पाटील यांनी दिला.
“महात्मा गांधींच्या विचारांचा आदर्श ठेवून अहिंसक मार्गाने हा लढा सुरू केला जाणार आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे. प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक राहिले नाही, तर जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जुन्या निकषांचा पुनर्विचार करण्याची मागणी
शेतकऱ्यांच्या सध्याच्या आर्थिक आणि नैसर्गिक संकटाचा विचार करून दुष्काळाचे निकष बदलण्याची गरज असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
“ब्रिटिशकालीन नियम आणि जुन्या पद्धतींच्या आधारे आजच्या परिस्थितीचे मूल्यमापन केले, तर शेतकऱ्यांसमोरील संकट आणखी गडद होईल. हवामानातील बदल, पावसातील अनिश्चितता, वाढलेला उत्पादन खर्च आणि पिकांच्या बदललेल्या स्वरूपाचा विचार करून दुष्काळाचे निकष निश्चित करणे आवश्यक आहे. सरकारने प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेऊन तातडीने फेरविचार करावा,” अशी मागणी त्यांनी केली.
फळबागांसाठी स्वतंत्र निकषाची गरज
द्राक्ष, डाळिंब, आंबा यांसारख्या फळबागांवर शेतकऱ्यांची मोठी गुंतवणूक असते. त्यामुळे पारंपरिक पिकांसाठी असलेल्या निकषांपेक्षा फळबागांसाठी स्वतंत्र निकष निश्चित करून दुष्काळी सवलतींचा लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
“द्राक्ष, डाळिंब, आंबा आदी फळबागांसाठी शेतकरी लाखो रुपये खर्च करतात. पिकांचे नुकसान झाले की त्याचा परिणाम केवळ एका हंगामावर होत नाही, तर पुढील अनेक वर्षांच्या उत्पन्नावर होतो. त्यामुळे फळबागांचा स्वतंत्रपणे विचार करून दुष्काळी सवलती आणि मदत देण्याची गरज आहे,” असे पाटील म्हणाले.
कर्जमाफीबाबतही नाराजी
राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र प्रत्यक्षात झालेली कर्जमाफी अपुरी असल्याचे संजयकाका पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या वाढत्या कर्जबाजारीपणाचा विचार करून व्यापक स्वरूपाची मदत आवश्यक आहे. विशेषतः फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या कर्जाचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
वीजनिर्मितीऐवजी पाणी शेतीसाठी वापरण्याची मागणी
कोयना धरणातील पाण्याच्या वापराबाबतही पाटील यांनी महत्त्वाची मागणी केली. कोयना धरणातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. मात्र यंदा दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याने उपलब्ध पाण्याचा अधिकाधिक वापर शेतीसाठी करण्याला प्राधान्य द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
“कोयना धरणातून दरवर्षी सुमारे ६७ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. यंदा दुष्काळाचे संकट गंभीर आहे. अशा परिस्थितीत वीजनिर्मितीसाठी पाणी वापरून ते समुद्राकडे वाहून जाण्यापेक्षा शेतीसाठी त्याचा उपयोग करण्याचा विचार झाला पाहिजे. वीजनिर्मितीसाठी सौरऊर्जा आणि पवनऊर्जेचा वापर वाढविण्यावर भर द्यावा,” असे त्यांनी सांगितले.
शेतकरी प्रश्नांसाठी जिल्हाव्यापी लढ्याची भूमिका
दुष्काळ, पाणी, कर्जमाफी, फळबागांचे नुकसान आणि पर्जन्यमानाच्या निकषांसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सांगली जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून व्यापक लढा उभारण्याची भूमिका संजयकाका पाटील यांनी मांडली.
२ ऑक्टोबर रोजी होणारे आंदोलन अहिंसक पद्धतीने करण्यात येणार असून, त्यानंतर शासनाच्या भूमिकेवर पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गांधी जयंतीदिनी सांगलीत होणाऱ्या या आंदोलनाकडे शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या