प्रतिष्ठा न्यूज
कुंडल, ता. पलूस : सन २०१० पासून कुंडल येथे रणसंग्राम सोशल फाऊंडेशनच्या वतीने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला जातो. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या या उत्सवाला परिसरात विशेष महत्त्व असून, महिलांचीही या उत्सवातील उपस्थिती लक्षणीय असते. दहीहंडीच्या निमित्ताने फाउंडेशनकडून विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमही राबविण्यात येतात.
मात्र, समाजातील लोकभावना आणि दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांच्या भावनांशी सहभागी होण्याची परंपरा जपत रणसंग्राम सोशल फाऊंडेशनने यंदाची मानाची दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील वर्षी समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या स्वर्गीय भारतीताई लाड यांच्या दुःखद निधनामुळे फाउंडेशनने दहीहंडी उत्सव रद्द केला होता. यावर्षीही विविध सामाजिक, लोकशाहीविषयक आणि जनभावनांशी संबंधित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर उत्सव साजरा करणे मनाला पटत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
यावर्षी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनासह देशातील सामाजिक अस्थिरतेची परिस्थिती, लोकशाहीमध्ये नागरिकांची होणारी गळचेपी, तसेच हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्नावर सरकारची उदासीनता याबाबत फाउंडेशनने चिंता व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर नेपाळमधील महापूर व प्रलय, दिल्ली येथे Gen Z आंदोलन मोडीत काढण्यासाठी विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीमाराची घटना, तसेच पुणे येथे संतोष पंडित आणि विद्यानंद बापट यांसारख्या सामान्य नागरिकांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या घटनांमुळे देशातील लोकशाहीच्या सद्यस्थितीबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे फाउंडेशनने म्हटले आहे.
"बळी तो कानपिळी" अशी लोकशाहीची अवस्था निर्माण झाल्याच्या वातावरणात उत्सव साजरे करणे मनाला पटत नाही. त्यामुळे सामाजिक संवेदना आणि लोकभावनांचा आदर करत यंदाची रणसंग्राम सोशल फाऊंडेशनची आपली संस्कृती व परंपरा जपणारी मानाची दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे," अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. दीपक लाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान, उत्सव रद्द केला असला तरी संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा खंडित होणार नाही, असे फाउंडेशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत रणसंग्राम सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक संस्कार, सामाजिक बांधिलकी, आपली संस्कृती आणि परंपरा यांचा विचार जपणारे विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या