सांगली, दि. २१ : गणेशोत्सव, गणपती विसर्जन मिरवणुका तसेच शहरातील विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावेत, यासाठी सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाने ‘Compressed-Air Confetti Poppers’ आणि ‘Party Poppers’च्या वापरावर सक्त मनाई केली आहे. महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.
महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक रस्ते, चौक, फुटपाथ, सार्वजनिक ठिकाणे, गणेशोत्सव व गणपती विसर्जन मिरवणुका, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक मिरवणुका, सार्वजनिक सभा तसेच महापालिकेच्या मालकीच्या किंवा नियंत्रणाखालील ठिकाणी हा आदेश लागू राहणार आहे.
या आदेशानुसार Compressed-Air Confetti Poppers, Party Poppers, तत्सम पॉपर्स किंवा उपकरणे तसेच त्यामधून बाहेर पडणारे प्लास्टिक अथवा मेटॅलिक कन्फेटी आणि स्ट्रीमर्स वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. गणेशोत्सव मंडळे आणि मिरवणूक आयोजकांनी सहभागी कार्यकर्ते व नागरिकांना याबाबत पूर्वसूचना देऊन नियमांचे पालन सुनिश्चित करावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
अचानक मोठ्या आवाजामुळे घबराटीचा धोका
मिरवणुका आणि गर्दीच्या ठिकाणी कन्फेटी पॉपर्सचा वापर केल्याने अचानक मोठा आवाज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्दीच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा उपकरणांचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय पॉपर्समधून बाहेर पडणारे कागद, प्लास्टिक व मेटॅलिक स्ट्रीमर्स रस्त्यावर विखुरल्याने सार्वजनिक स्वच्छतेवर परिणाम होतो. हा कचरा गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेसाठी अतिरिक्त आव्हान ठरते.
मंडळांनी नियमांचे पालन करावे
गणेशोत्सव मंडळे, गणपती विसर्जन मिरवणूक आयोजक तसेच धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांनी आपल्या कार्यकर्त्यांना कन्फेटी पॉपर्स व पार्टी पॉपर्सच्या वापरास मनाई असल्याची माहिती द्यावी. तसेच महापालिकेकडून देण्यात आलेल्या परवानगीतील सर्व अटींचे काटेकोर पालन करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मिरवणूक मार्गावर कन्फेटी, प्लास्टिक, कागद अथवा अन्य कचरा विखुरला जाणार नाही, याचीही आयोजकांनी दक्षता घ्यावी. उत्सव साजरा करताना सार्वजनिक सुरक्षितता, स्वच्छता आणि पर्यावरणाचे भान ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“उत्सव आनंदाचा, पण स्वच्छता आणि सुरक्षिततेची जबाबदारीही आपलीच”
महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी गणेशोत्सव मंडळे, मिरवणूक आयोजक आणि नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
“गणेशोत्सव हा आनंद, श्रद्धा आणि उत्साहाचा उत्सव आहे. उत्सव साजरा करताना नागरिकांची सुरक्षितता, सार्वजनिक स्वच्छता आणि पर्यावरणाची जबाबदारीही आपण सर्वांनी जपली पाहिजे. Confetti Poppers, Party Poppers किंवा प्लास्टिक/मेटॅलिक कन्फेटीचा वापर न करता सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा,” असे आवाहन त्यांनी केले.
उल्लंघन केल्यास कारवाई
महापालिका आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास लागू असलेल्या कायदेशीर व प्रशासकीय तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक किंवा अन्य कचरा विखुरल्यास स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाच्या लागू तरतुदींनुसार स्वतंत्र कारवाई होऊ शकते. आवश्यकतेनुसार संबंधित प्रकरण पोलीस प्रशासन तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे.
“मिरवणूक उत्साहाची… रस्ता स्वच्छतेची!” या भूमिकेतून गणेश विसर्जन मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांनंतर निर्माण होणारा कचरा कमी करण्यासाठी नागरिकांनी आणि आयोजकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या