सांगली प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा विभाग व पंचायती राज मंत्रालय,भारत सरकार यांच्याद्वारे आयोजित,यावर्षीची दोन दिवसीय 29 वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स ही राजस्थान येथील जयपूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये केंद्र सरकार पासून ते राज्य सरकार ते जिल्हा प्रशासन ते ग्रामपंचायत स्तरापर्यंतच्या, विविध विभागात काम केलेल्या उत्कृष्ट अधिकारी तथा विभाग व संस्था यांना पुरस्कृत केले जात आहे. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार श्रेणीमध्ये प्रथमच 2025 वर्षी ग्रामपंचायत ही श्रेणी समाविष्ट करण्यात आली आणि यावर्षी 2026 ला हे द्वितीय वर्ष आहे.
ग्रामपंचायत श्रेणी अंतर्गत " *सेवा वितरणाचे सक्षमीकरण करण्यासाठी तळागाळातील उपक्रम* " या शीर्षका अंतर्गत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना दरवर्षी पुरस्कृत केले जाते. या स्पर्धेत देशभरातील 6 लाख 40 हजार गावांसाठी उपलब्ध असलेल्या 2 लाख 68 हजार ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 40 हजारापेक्षा जास्त गावांसाठी असलेल्या, 28 हजार ग्रामपंचायतीचा सुद्धा सहभाग होता. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली श्री विशाल सविता तेजराव नरवाडे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून, देशभरातील एकूण सहा लाखापेक्षा जास्त गावांतून, सांगली जिल्ह्यातील, कडेगाव तालुक्यातील, कडेपूर ग्रामपंचायत ही देशातून प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पुरस्कार साठी पात्र ठरलेली आहे.
कडेपूर ग्रामपंचायतचे सक्रिय सरपंच सतीश देशमुख, उपसरपंच हनुमंत गरुड व ग्रामपंचायत अधिकारी एस. डी. मुलानी व समस्त ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागाने, व कडेगाव गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, विस्तार अधिकारी श्रीधर कुलकर्णी, यांच्या समन्वयाने राष्ट्रीय स्तरावरील उपलब्ध करण्यास सहकार्य लाभले.
*कडेपूर गावाची सुवर्ण कामगिरी*
कडेपूर ग्रामपंचायत मध्ये नागरिकांना दिल्या जाणाऱ्या 1000 पेक्षा जास्त, संपूर्णपणे शंभर टक्के डिजिटल करण्यात आले आहेत. तसेच ग्रामपंचायत स्तरावर ए. आय., ब्लॉकचैन, जीआयएस मॅपिंग, रोबोटिक्स, यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामपंचायतचे सक्षमीकरण करण्यात आले आहे. तसेच लोकांच्या सूचना व तक्रारी प्राप्त करण्यासाठी भारत सरकारचे मेरी पंचायत ॲप सर्वात जास्त वापर करणारी देशातली सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत ठरली आहे. त्याचप्रमाणे गावात पार पडलेल्या ग्रामसभा, त्याचे निर्णय, फोटोज व व्हिडिओज निर्णय ॲपवर अपलोड करून राष्ट्रीय ॲपचा वापर करणारी सुद्धा देशातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत ठरली आहे. यामुळे ग्रामस्थांना फिजिकली ग्रामपंचायत इमारतीला भेट न देता, देशात कुठेही असताना, आपल्या मोबाईलवर घरबसल्या सेवा साठी अर्ज करून विविध सेवा प्राप्त करण्यास सुलभ झाले आहे. जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह दाखला यासारख्या एक हजाराहून जास्त सेवा घरबसल्या ऑनलाईन प्राप्त झाल्याने लोकांचे जीवन सुकरमान होण्यास मदत झाली आहे व ग्राम सुशासनात अमुलाग्र सुधारणा झाली आहे.
*राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचा प्रवास*
सर्वप्रथम कडेपुर ग्रामपंचायत कडेगाव तालुक्यातील प्रथम आल्यानंतर, सीईओ विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यानंतर, पुणे विभागाला विभाग स्तरीय समितीसमोर सी ओ यांनी स्वतः टीम सहित सादरीकरण केले. प्रभावी सादरीकरणानंतर पुणे विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यानंतर राज्यस्तरीय टीमने क्षेत्रीय भेट देऊन कडेपूर ग्रामपंचायती पाहणी केली व महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर केंद्र सरकारच्या दिल्लीवरून दोन सदस्य टीम एकूण तीन दिवसासाठी कडीपूर ग्रामपंचायतीला भेट दिली असता ,सीओ जिल्हा परिषद सांगली व तालुका कडेगाव ची टीम व ग्रामस्तरीय टीम यांनी एकत्रित येऊन गावाची कामाची योग्य ती मांडणी केली. त्यानंतर मे 2026 या महिन्यात दिल्ली येथे सरपंच ग्रामपंचायत अधिकारी व सीईओ जिल्हा परिषद सांगली यांनी भारत सरकार सचिव यांच्या टीमच्या समोर प्रत्यक्ष सादरीकरण केले व प्रश्न उत्तर नुसार गुणांकन करण्यात आले. या प्रकारे प्रदीर्घकाळ चालणाऱ्या काठीन्यप्रक्रियेतून कडेपूर ग्रामपंचायत ची राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पुरस्कारासाठी निवड झाली.
दोन दिवसीय इ गव्हर्नन्स राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या दिवशी, 1 जुलै 2026 रोजी, जयपूर येथे, विविध राज्यातून आलेल्या अधिकाऱ्यांच्या समक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली विशाल नरवाडे यांनी कडेपूर ग्रामपंचायतीची यशोगाथा व आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात, याबद्दल सविस्तर सादरीकरण व अनुभव राष्ट्रीय टीम समोर सादर करून , सांगली जिल्ह्याचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले.
आज 2 जुलै 2026 रोजी सायंकाळी, केंद्रीय मंत्री भारत सरकार व माननीय मुख्यमंत्री राजस्थान सरकार यांच्या हस्ते कडेपूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या