सांगली, दि. १ : बुद्धिबळ भिष्माचार्य आदरणीय भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त "शिका बुद्धिबळ – वाढवा ज्ञान" या संकल्पनेतून दि. ४ व ५ जुलै २०२६ रोजी बेसिक शास्त्रोक्त बुद्धिबळ प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये वयाची ५ वर्षे पूर्ण झालेल्या बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना सहभागी होता येणार आहे.
शनिवार व रविवार या दोन दिवसांत दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत एकूण ८ तासांचे प्रशिक्षण दिले जाणार असून, बुद्धिबळ खेळाची प्राथमिक माहिती, मोहरे, नियम, डावपेच आणि प्रत्यक्ष खेळण्यापर्यंतचे मार्गदर्शन तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून केले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी केवळ ५० सहभागींची मर्यादित प्रवेशसंख्या ठेवण्यात आली आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, बुद्धिबळामुळे कौशल्य विकास, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढणे, समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होणे, आयक्यू पातळीत वाढ, दबावाखाली योग्य निर्णय घेण्याची क्षमता, आत्मविश्वास व संयम वाढणे असे अनेक लाभ होतात. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच शिस्त, जबाबदारीची जाणीव आणि खेळाडूवृत्ती विकसित होण्यासही बुद्धिबळ अत्यंत उपयुक्त ठरते.
प्रशिक्षणाची प्रवेश फी २०० रुपये असून त्यामध्ये दोन दिवसांचा नाश्ता व प्रशस्तिपत्राचा समावेश आहे. प्रवेशासाठी सहभागीचे नाव, जन्मतारीख, शाळेचे नाव तसेच प्रवेश फी भरल्याचा स्क्रीनशॉट जोडणे आवश्यक आहे.
हे प्रशिक्षण वर्ग एकाच वेळी सुरज ललित कला अकॅडमी, एमआयडीसी कुपवाड, सांगली, सावरकर प्रतिष्ठानचे प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला, सावरकर कॉलनी, सांगली आणि लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे रा. बा. पाटील बालमंदिर, नेमिनाथ नगर, राजमती भवन समोर, सांगली येथे आयोजित करण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी दीपक वायचळ (नूतन बुद्धिबळ मंडळ, सांगली) – मो. ९४२३८७२९२४ किंवा विनायक ऐनापुरे – मो. ९२२५८३९०६६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या