प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: अकाली आलेल्या अंधत्वावर खचून न जाता जिद्दीच्या जोरावर आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या निमणी येथील पवन दत्तात्रय पाटील यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘येरळाभूषण’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.श्री हनुमान जयंती निमित्त राष्ट्रशक्ती कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दरवर्षी गावातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीचा गौरव केला जातो.गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेत यंदा पवन पाटील यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.पवन दत्तात्रय पाटील यांनी माध्यमिक शिक्षण पंचक्रोशी विद्यानिकेतन येथे पूर्ण केले,तर उच्च माध्यमिक व पदवी शिक्षण तासगाव येथे घेतले.विद्यार्थी अवस्थेतच सामाजिक कार्याची आवड जोपासत त्यांनी अनेक गरजू कुटुंबांना शासकीय मदत मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.तसेच तासगाव व मिरज परिसरातील सामाजिक संस्थांना क्रीडा साहित्य वाटप,अनाथ आश्रमात दरवर्षी फराळाचे वितरण असे विविध उपक्रम त्यांनी राबविले.सुमारे सात वर्षांपूर्वी अचानक आलेल्या अंधत्वानंतरही त्यांनी हार न मानता नव्या जोमाने उभारी घेतली.अंधत्व आलेल्या युवकांना समुपदेशन करून मोबाईल,लॅपटॉप यांसारख्या तांत्रिक साधनांचा वापर शिकविण्याचे प्रशिक्षण ते देत आहेत.शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत २०२२ मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून एम.एस.डब्ल्यू.पदवी प्राप्त केली.सध्या शासकीय किंवा निमशासकीय नोकरीसाठी प्रयत्न सुरू असून,गावातच व्यवसाय उभारून स्वावलंबी होण्याची त्यांची इच्छा आहे.या कठीण प्रवासात त्यांची आत्या सुशीला पाटील व मित्रपरिवाराने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.त्यांच्या व्यवसायासाठी ग्रामपंचायत हद्दीत मोफत जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही सरपंच सौ.रेखा रविंद्र पाटील, उपसरपंच राजेंद्र घोडके यांनी दिली. तसेच जिल्हा परिषद सदस्य अमित पाटील यांनी त्यांच्या व्यवसायासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.या सन्मान सोहळ्यास नवनाथ मस्के,आण्णासाहेब चौगुले,शिवाजी जाधव,आर.डी.पाटील,सतीश पाटील,अनिल सदामते,सागर चौगुले, संतोष सावंत, नितीन शेळके, रघुनाथ सावंत, अक्षय पाटील, महेश ढाणे, दिलीप लुगडे, पंडित राजमाने, विकास पाटील, रघुनाथ गायकवाड, विशाल मस्के, निखिल गायकवाड, आदित्य पाटील, ऋषिकेश खरपुडे, अरुण मस्के, सचिन मस्के, निवास गाडवे, अनिकेत देवकुळे, राहुल पाटील यांच्यासह राष्ट्रशक्ती कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी, हनुमान जयंती उत्सव समिती व ग्रामस्थ महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 अंधत्वावर मात करून समाजसेवेचा दीप प्रज्वलित करणारे पवन दत्तात्रय पाटील यांचे कार्य आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या