प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. १६ : पर्यटन संचालनालयामार्फत ‘नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत पुणे प्रादेशिक विभागातील इच्छुक युवक-युवतींसाठी सात दिवसांचे टुरिस्ट गाईड प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये पर्यटन स्थळांवर मार्गदर्शन, आदरातिथ्य सेवा तसेच पर्यटनाशी संबंधित कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी इच्छुक युवक-युवतींनी गुगल फॉर्मद्वारे २० मार्च २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय पुणे चे उपसंचालक भरत लांघी यांनी केले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक पर्यटन स्थळांची माहिती मिळावी यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत पर्यटन सुलभ मार्गदर्शक (टूर गाईड) तयार करण्यात येणार आहेत. यासाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षण दिले जाणार असून त्यामुळे त्यांना पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
पुणे प्रादेशिक विभागात येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील इच्छुक उमेदवारांना या प्रशिक्षणामध्ये सहभागी होता येणार आहे. पुणे विभागातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांबाबत पर्यटकांना प्रभावी मार्गदर्शन करता यावे यासाठी एकूण २०० युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पर्यटन क्षेत्रात स्वतःचे करिअर घडवण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचेही पर्यटन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
या प्रशिक्षणासाठी ग्वाल्हेर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट (आयटीटीएम) तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत. सात दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना पर्यटन संचालनालयाकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच सिंहस्थ कालावधीत टूर गाईड म्हणून काम करण्यासाठी त्यांना ओळखपत्र देखील दिले जाणार आहे. फिरस्तीची आवड असलेल्या युवकांनी प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन भरत लांघी यांनी केले आहे.
इच्छुक उमेदवारांसाठी नोंदणीसाठी गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला असून दि. २० मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. अर्जांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्वावर करण्यात येणार आहे. इच्छुकांना https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbn0rmXID8oR8hfCD_Zdx1PyHbLDcUeAynPwPWHs5RgVKG4Q/viewform?usp=publish-editor लिंकवर नोंदणी करता येईल. प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा किमान १८ वर्षे व कमाल ४५ वर्षे तसेच कोणत्याही शाखेतील किमान पदवीधर असे पात्रता निकष आहेत. अधिक माहितीसाठी प्रादेशिक पर्यटन कार्यालय, पुणे यांच्या ८०८००३५१३४ यावर संपर्क साधता येईल.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या