नवी दिल्ली / मुंबई : देशभरात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरत असताना केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. सध्या देशात कोणताही लॉकडाऊन लागू करण्याचा विचार नसल्याचे सरकारने ठामपणे सांगितले आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकारांशी बोलताना कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन लागणार नसून जर कोणी अशी अफवा पसरवली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
केंद्र सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही असत्य आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्सद्वारे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांना अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
यासोबतच, जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनीही नागरिकांना आवाहन केले आहे. “अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा आणि कोणतीही अप्रमाणित बातमी पुढे पाठवू नका,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. जर समाज माध्यमावर अशी कोणती अफवा पसरवली किंवा आलेली पोस्ट शेअर केली तरीही फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
प्रशासनाकडून सांगण्यात आले की, कोणतीही महत्त्वाची माहिती केवळ अधिकृत सरकारी माध्यमांतूनच जाहीर केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेश फॉरवर्ड करण्यापूर्वी खात्री करून घ्यावी.
दरम्यान, आरोग्य यंत्रणा सज्ज असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचेही सांगण्यात आले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करत संयम राखावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या