प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आणि महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर राज्यभर ‘महाराष्ट्र बारव दीपोत्सव’ उत्साहात साजरा होत आहे.मंदिर घाट,बारव आणि जलस्रोतांचे जतन व पुनर्जीवन यासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते.त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे.‘महाराष्ट्र बारव मोहीम’च्या माध्यमातून राज्यातील ऐतिहासिक जलवारसा जतन व संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विविध ठिकाणी दीपप्रज्वलन करण्यात येत आहे.ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा,तसेच जलस्रोतांचे महत्त्व अधोरेखित व्हावे, या उद्देशाने उद्या १५ फेब्रुवारी २०२६ रोजी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.तासगाव शहरातील ढवळवेस येथील ऐतिहासिक बारव येथे सायंकाळी ठीक ६ वाजता दीपोत्सव साजरा होणार आहे.परिसरातील नागरिक व शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.“एक दीप ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी” या संकल्पनेतून जलसंवर्धन आणि वारसा जपण्याचा संदेश दिला जाणार आहे.हा उपक्रम ‘महाराष्ट्र बारव मोहीम’ व ‘शिवनेरी मित्र मंडळ तासगाव’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या