प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज : क्रांतीज्योती घरेलू कामगार संघटना व सेवा सदन फाउंडेशन, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली–मिरज क्षेत्रातील घरेलू कामगारांसाठी रेशन कार्ड व विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सेवा सदन हॉस्पिटल, मिरज येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न होणार आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन मा. डॉ. रविकांत पाटील, चेअरमन – दत्तोपंथ ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण बोर्ड, पुणे यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यशाळेमध्ये घरेलू कामगारांसाठी उपयुक्त अशा महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रेशन कार्ड व त्यासंदर्भातील विविध अडचणी या विषयावर मा. वर्षा कदम, जिल्हा पुरवठा निरीक्षक, मिरज मार्गदर्शन करणार आहेत. तसेच “कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३” या विषयावर मा. बालाजी बोकलवाड, तालुका संरक्षण अधिकारी, मिरज सविस्तर माहिती देणार आहेत. यासोबतच विविध शासकीय योजना या विषयावर मा. सर्जेराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
घरगुती कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि कार्यस्थळी सुरक्षिततेबाबत माहिती मिळावी, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यशाळेत जास्तीत जास्त घरेलू कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सांगली–मिरज घरेलू कामगार ग्रुप लीडर व सेवा सदन फाउंडेशन, मिरज यांच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या