प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : शहरातील मुख्य रस्ता आणि अनेक गल्ली-बोळांमध्ये विना परवाना बांधकाम साहित्य सर्रास रस्त्यावर टाकले जात असल्याने वाहतुकीची अक्षरशः वाट लागली आहे.वाळूचे ढीग,खडीचे ढिगारे, लोखंडी सळ्या आणि सिमेंटच्या पोत्यांमुळे रस्ते अरुंद झाले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे.परिणामी दररोज कोंडी,किरकोळ अपघात आणि वादांचे प्रकार वाढत आहेत.
पार्किंगची समस्या तीव्र बनली असून पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालताना जीव धोक्यात घालावा लागत आहे. संबंधित बांधकामांना आवश्यक परवानगी आहे का,याची कोणतीही ठोस तपासणी होत नसल्याने नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र दिसत आहे.पालिका प्रशासनाने या प्रकाराची दखल घेत नियमभंग करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.रस्त्यावरचे अडथळे तात्काळ हटवावेत,अन्यथा थेट कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.नागरिकांतून मात्र “इशारा नव्हे, कारवाई हवी!” अशी ठाम मागणी केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या