प्रतिष्ठा न्यूज
सांगली : सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट एलईडी पथदिवे प्रकल्पाच्या कामात गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप करत संबंधित कंपनीवर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक 16 च्या नगरसेविका अँड स्वाती शिंदे यांनी आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस ॲड. स्वाती शिंदे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील पथदिवे बसविण्याच्या कामासाठी सुमारे 500 कोटी रुपयांचा करार करण्यात आला असून 15 वर्षांच्या कालावधीतील देखभाल व संचालनाची जबाबदारी संबंधित कंपनीकडे आहे. मात्र, अद्यापही अनेक भागांत एलईडी दिवे बसविण्याचे काम अपूर्ण असून करारातील अटींचे पालन झालेले नाही.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, करारानुसार सर्व पथदिव्यांचे सर्वेक्षण, जुने दिवे काढणे, नवीन एलईडी बसविणे, तसेच मॉनिटरिंग सिस्टीम व सेंट्रलाइज्ड कंट्रोल प्रणाली कार्यान्वित करणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात अनेक प्रभागांमध्ये दिवे बसविलेले नाहीत. परिणामी काही भागांत अंधाराचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेषत: प्रभाग क्रमांक 16 मध्ये सुमारे 102 नवीन पथदिवे बसविणे आवश्यक असताना ते काम प्रलंबित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित कंपनीकडून तात्काळ कार्यवाही होत नसल्याने महापालिकेने करारातील अटींची अंमलबजावणी करून कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
करारातील उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून मॉनिटरिंग सिस्टीम आणि सेंट्रलाइज्ड कंट्रोल प्रणाली सुरू करावी, अन्यथा कठोर कारवाई करावी अशी मागणी नगरसेविका ॲड स्वाती शिंदे यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या