प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यात पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना थरार अनुभवता येणार असून उगवाई देवी चषक २०२५-२६ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ११ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ही स्पर्धा रंगणार असून तालुक्यासह परिसरातील क्रिकेटरसिकांचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे.
गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी व करवीर ग्रामीण तालुक्यांतील नामवंत संघ या स्पर्धेत आपली ताकद आजमावणार आहेत. पॉईंट सिस्टीम, आंतरराष्ट्रीय नियमांनुसार सामने, LBW नियमाचा समावेश, तसेच ६ षटकांचे झटपट सामने यामुळे प्रत्येक सामना चुरशीचा ठरणार आहे.
स्पर्धेतील सामने युट्यूबवर थेट प्रक्षेपित केले जाणार असल्याने मैदानावर तसेच ऑनलाईन प्रेक्षकांनाही क्रिकेटचा थरार अनुभवता येणार आहे. विजेत्या संघासाठी ₹५१ हजार, उपविजेत्यासाठी ₹३१ हजार, तर दोन उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी ₹१५ हजार अशी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय वैयक्तिक कामगिरीसाठीही स्वतंत्र बक्षिसे दिली जाणार आहेत.
प्रत्येक संघाला १,००,००० पॉईंट बॉलिंग, आयकॉन खेळाडूची संधी, तसेच प्रथम नोंदणी करणाऱ्या १६ संघांना सहभाग अशी रचना करण्यात आली आहे. प्रत्येक सामन्यात गगनबावडा तालुक्यातील किमान तीन स्थानिक खेळाडूंचा सहभाग अनिवार्य ठेवण्यात आला आहे.
ही स्पर्धा गगनबावडा स्पोर्ट्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आली असून क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन श्री रवी खोत, अबू सय्यद, व इरफान म्हालदार आदी आयोजकांनी केले आहे.
गगनबावड्यात क्रिकेटचा थरार; उगवाई देवी चषक स्पर्धेला ११ फेब्रुवारीपासून सुरुवात
By -
जानेवारी १३, २०२६
0
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या