प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : मुलींनो आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात कायदेशीर आवाज उठवा असे आवाहन अॅड. प्रतीक चव्हाण यांनी केले.ते मणेराजुरी येथील हनुमान एज्युकेशन सोसायटी संचलित कन्या विद्यालय, मणेराजुरी येथे तालुका विधी सेवा समिती,तासगाव यांच्या वतीने विद्यार्थिनींसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात बालविवाह प्रतिबंधक कायदा, सायबर सेल तसेच इतर महत्त्वाच्या कायद्यांबाबत चव्हाण यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना अॅड. प्रतीक चव्हाण यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देताना बालविवाहाचे दुष्परिणाम,कायद्यानुसार असलेली शिक्षेची तरतूद तसेच बालविवाह रोखण्यासाठी समाजाची जबाबदारी यावर प्रकाश टाकला.मुलींनी स्वतःच्या हक्कांची जाणीव ठेवावी आणि कोणत्याही अन्यायाविरुद्ध कायदेशीर मार्गाने निर्भयपणे आवाज उठवावा,असे आवाहन त्यांनी केले.यावेळी सायबर गुन्हे,सोशल मीडियावरील धोके,ऑनलाईन फसवणूक यासंदर्भात विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले.मोबाईल व इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा,तसेच सायबर गुन्हा घडल्यास तक्रार कुठे आणि कशी करावी, याचीही माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका बागवडे यांनी केले. कार्यक्रमास केदार खारगे,दीपक मोरे, अॅड.अक्षय पाटील,अॅड.आयुष पवार तसेच पोलीस पाटील दीपक तेली उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना कायद्याची माहिती घेऊन आत्मविश्वासाने व निर्भयपणे जीवन जगण्याचा संदेश दिला.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करण्यात आले.सूत्रसंचालन शिंदे यांनी केले,तर आभार भोरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या