बलवडी (भा.) येथील साहित्य संमेलनात ॲड.कृष्णा पाटील यांच्या 'नियतीचे खटले' या पुस्तकाचे प्रकाशन करताना समीक्षक प्रा.डॉ.रणधीर शिंदे , ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट, युवानेते डॉ. जितेश कदम, व्ही.वाय.पाटील , सरपंच शालन कुंभार, सुरेश चव्हाण, सतीश लोखंडे आदी.
प्रतिष्ठा न्यूज/ किरण कुंभार तासगाव : मराठी साहित्य क्षेत्रामध्ये सध्या साचलेपण आले आहे आणि पुस्तके खपत नाहीत अशी ओरड आपण सतत ऐकतो. परंतु ॲड. कृष्णा पाटील यांनी लिहिलेले 'नियतीचे खटले' हे पुस्तक या सर्व गोष्टींना छेद देत जोरदारपणे खपत आहे. साहित्य क्षेत्रामध्ये ताजेपणा, टवटवीतपणा आणि नवी पहाट घेऊन येणारे हे पुस्तक ठरेल, अशी आशा शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख आणि संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी व्यक्त केली.
बलवडी (भा.) येथे संपन्न झालेल्या ३३ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात तासगाव येथील लेखक ॲड. कृष्णा पाटील यांच्या 'नियतीचे खटले' या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. रणधीर शिंदे यांच्या हस्ते दिमाखात पार पडले.यावेळी ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट, युवानेते डॉ. जितेश कदम, व्ही.वाय.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. शिंदे पुढे बोलताना म्हणाले, न्यायालयात न्याय हवा असणारे आणि अन्याय करणारे दोघेही येत असतात. त्यांच्यामधील संबंध, हेवेदावे आणि माणसाची नियत या सर्व बाबींवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक असून ते गरीब होतकरू युवकांना संघर्ष करण्याची मोठी प्रेरणा देते.
बाबासाहेब परीट यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कृष्णा पाटील यांनी लिहिलेला हा कथासंग्रह प्रत्येकाने वाचायला हवा आणि संग्रही ठेवावा असाच आहे. ग्रामीण भागातील वास्तव चित्रण, मानवी मनाची गुंतागुंत आणि संपत्तीसाठी नियत बदलणारी माणसे यांचे अत्यंत वाचनीय चित्रण यात केले आहे. कितीही अन्याय झाला तरी शेवटपर्यंत चिवटपणे झुंज देणारी माणसे आणि स्त्रियांची जिद्द या पुस्तकात प्रभावीपणे मांडली असून हे पुस्तक प्रत्येकाची समज वाढवणारे आहे.
डॉ. जितेश कदम यांनी या पुस्तकाचे कौतुक करताना म्हटले की, 'नियतीचे खटले' हे पुस्तक तरुणांसाठी दिशादर्शक आहे. यातील सर्वच कथा वास्तववादी असून आपल्या आजूबाजूला हे प्रसंग घडत आहेत असेच वाचताना वाटत राहते. खडतर परिस्थितीतही माणसे कशी झुंजतात याचे यथार्थ वर्णन लेखकाने केले आहे.यावेळी लेखक ॲड.कृष्णा पाटील यांनी आपल्या मनोगतात बलवडीच्या ज्योतिर्लिंग वाङ्मय साहित्यसेवा संस्थेचे व संमेलन संयोजकांचे आभार मानले
या प्रकाशन सोहळ्याला जिल्ह्यातील साहित्यिक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या