प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेला सोमवारी चांगलीच रंगत आली. विविध गटांतून दाखल झालेल्या अर्जांची तपासणी तब्बल आठ तास सुरू होती. त्यात खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, खासदारांच्या पत्नी पूजा विशाल पाटील तसेच अनिता सगरे या सहा उमेदवारांच्या अर्जांवर हरकती दाखल झाल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष छाननीच्या निर्णयाकडे लागले आहे.
कागदपत्रांची पूर्तता, सभासदत्वाचा कालावधी, थकबाकी, पात्रतेसंदर्भातील नियम तसेच सहकार क्षेत्रातील लागू असलेल्या तरतुदी यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर हरकतदार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून युक्तिवाद करण्यात आला. त्यामुळे छाननीची प्रक्रिया अपेक्षेपेक्षा अधिक वेळ चालली. अखेर सायंकाळी साडेसहा वाजता छाननी पूर्ण झाली. मात्र, हरकतींवरील अंतिम निर्णय राखून ठेवण्यात आला असून तो मंगळवारी (ता. ६) जाहीर होणार आहे.
२१ जागांसाठी ३५१ अर्ज
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकपदांसाठी तब्बल ३५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने छाननीच्या प्रक्रियेलाच महत्त्व प्राप्त झाले होते. त्यात प्रमुख राजकीय नेत्यांच्या उमेदवारी अर्जांवर हरकती दाखल झाल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले.
बँक परिसरात समर्थकांची गर्दी
हरकतींची माहिती समोर आल्यानंतर संबंधित उमेदवारांचे समर्थक, पदाधिकारी तसेच कायदेशीर सल्लागार आणि वकिलांचे पथक जिल्हा बँकेच्या परिसरात दाखल झाले. दिवसभर बँक परिसरात राजकीय हालचाली वाढल्या होत्या. कोणत्या उमेदवाराचा अर्ज वैध ठरणार आणि कोणाच्या अर्जावर काय निर्णय होणार, याबाबत समर्थकांमध्ये चर्चा सुरू होती.
आठ तास चालली छाननी
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर उमेदवारी अर्जांसोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. हरकती दाखल झालेल्या अर्जांवर संबंधित प्रतिनिधींना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. सभासदत्वाचा कालावधी, थकबाकी, आवश्यक दाखले आणि उमेदवारीसाठीच्या पात्रतेशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
छाननीदरम्यान काही अर्जांवर हरकतदारांकडून आक्षेप नोंदविण्यात आले, तर संबंधित उमेदवारांच्या प्रतिनिधींनी त्यावर आपली बाजू मांडली. त्यामुळे प्रत्येक हरकतीचा स्वतंत्रपणे विचार करण्याची प्रक्रिया सुरू राहिली.
सहा प्रमुख उमेदवारांच्या अर्जांवर हरकती
खासदार विशाल पाटील : गट ‘अ’मधून दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर सलग दोन वर्षे संचालकपद पूर्ण केल्याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर : गट ‘अ’मधील त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या दाखल्यांबाबत आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
आमदार सुरेश खाडे : गट ‘अ’ (अनुसूचित जाती) मधील उमेदवारीवर दोन वर्षांचे सभासदत्व नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
आमदार सत्यजित देशमुख : गट ‘अ’मधील त्यांच्या उमेदवारीवर संबंधित सहकारी संस्थेचे थकबाकीदार असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
पूजा विशाल पाटील : गट ‘अ’ महिला मतदारसंघातील उमेदवारीवर दोन वर्षांचे सभासदत्व नसल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
अनिता सपरे : महिला गटातील त्यांच्या उमेदवारी अर्जावर थकबाकीदार असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
मंगळवारी निर्णयाकडे लक्ष
सायंकाळी साडेसहा वाजता अर्जांची छाननी पूर्ण झाली असली तरी सहा प्रमुख उमेदवारांच्या अर्जांवरील हरकतींचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी मंगळवारी (ता. ६) या हरकतींवरील निर्णय जाहीर करणार आहेत.
या निर्णयानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मातब्बर नेत्यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरणार की हरकती मान्य होऊन अर्ज बाद होणार, याकडे राजकीय वर्तुळासह सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या