गगनबावडा : माणसांच्या जगात स्वार्थ आणि कपट वाढत असताना, मुक्या प्राण्यांमधील निस्वार्थ प्रेम, इमानदारी आणि संरक्षणाची भावना दाखवणारी एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. आपल्या नावाप्रमाणेच खऱ्या आयुष्यात 'हिरो' ठरलेल्या 'सल्या' उर्फ 'सलमान खान' या इमानी कुत्र्याची ही कहाणी आज निहारिका पार्क, कोल्हापूर फुलेवाडी परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या ओठांवर कौतुकाचा विषय बनली आहे.
जुना दुःखद इतिहास आणि असहाय्य आईचा आक्रोश
निहारिका पार्कच्या उत्तरेला वास्तव्यास असलेला 'सल्या' आणि मधल्या कॉलनीत राहणारी एक अत्यंत इमानी काळी कुत्री... सल्याला कोणीही जोडीदार नसताना ही कुत्री त्याची सोबती बनली. सुमारे सहा महिन्यांपूर्वी ही काळी कुत्री व्यायली होती. तिने अत्यंत आशेने अनेक पिल्लांना जन्म दिला. परंतु, दुर्दैवाचा असा फेरा आला की, निहारिका पार्कच्या दक्षिणेकडील ५ ते ६ आक्रमक कुत्र्यांच्या टोळीने त्या निष्पाप, गोंडस पिल्लांवर हल्ला करून त्यांचा अमानुषपणे फडशा पाडला. ती असहाय्य आई आपल्या पिल्लांना वाचवू शकली नाही. ते दुःख, तो आक्रोश तिने आपल्या पोटात दाबून ठेवला होता.
पुन्हा संकट आले अन् 'सल्या' रक्षणासाठी धावला!
नुकतीच ती काळी कुत्री पुन्हा व्यायली आणि तिने सहा नव्या जीवाला जन्म दिला. जुन्या भयंकर घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती दाट होती. परंतु, यावेळेस तिचे दुःख पाहणारा आणि तिच्या जीवाची काळजी करणारा 'सल्या' तिची ढाल बनून पुढे आला. सल्याला तिचे ते भूतकाळातील अश्रू आणि असहाय्यता जाणवली असावी. म्हणूनच, या वेळी त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या पिल्लांच्या संरक्षणाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली.
गेल्या ८ दिवसांपासून अभेद्य पहारा; वैऱ्यांचे पाऊलही पडेना!
गेल्या आठ दिवसांपासून सल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून २४ तास खडा पहारा देत आहे. दक्षिणेकडील ती ५ ते ६ वैरी कुत्री जेव्हा जेव्हा या परिसराच्या दिशेने येतात, तेव्हा हा एकटा सल्या छाती ठोकून त्यांच्यासमोर उभा ठाकतो. एका असहाय्य कुत्रीसाठी आणि तिच्या पिल्लांसाठी शत्रूंच्या अख्ख्या फौजेविरुद्ध एकटाच भिडणाऱ्या सल्याच्या या रौद्र अन् इमानी रूपामुळे त्या वैरी कुत्र्यांची या परिसरात फिरकण्याचीसुद्धा हिम्मत होत नाहीये!
परिसरात कौतुकाचा वर्षाव
आपल्या जीवाची बाजी लावून एका मातेचे आणि तिच्या पिल्लांचे रक्षण करणाऱ्या सल्याचे हे अद्भूत आणि भावूक कृत्य पाहून निहारिका पार्क आणि आजूबाजूच्या ३० ते ३५ कुटुंबांतील रहिवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत. मुक्या प्राण्यांमधील हे निस्सीम प्रेम, कौटुंबिक भावना आणि इमानदारी पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावत आहेत.
"माणूस आज नात्यांमध्ये स्वार्थ शोधत असताना, सल्याने दाखवलेले हे रक्षणकर्त्याचे रूप मानवतेलाही विचार करायला लावणारे आहे. सल्याने खऱ्या अर्थाने सिद्ध केले आहे की, इमानदारी ही शब्दांत नाही तर कृतीत असते!"
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या