प्रतिष्ठा न्यूज / दीपक शिंत्रे
विजयपूर : शहरात मध्यरात्री एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील गांधीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्ताफ मनगुळी (वय ३०) याची हत्या करण्यात आली. अल्ताफ याच्यावर चोरीसह विविध गुन्ह्यांप्रकरणी आरोप असल्याची माहिती आहे.
अल्ताफ काल रात्री जेवण केल्यानंतर घराबाहेर गेला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी तो मृतावस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांनी मृतदेह पाहल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
प्राथमिक माहितीनुसार, अल्ताफवर प्रथम चाकूने हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्यावर दगड टाकून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.
अनेक जणांनी मिळून हत्या केल्याचा संशय
घटनास्थळाच्या परिसरात रक्ताचे डाग आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक जणांनी मिळून अल्ताफची हत्या केली असावी, असा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
मित्रांसोबत बाहेर गेला होता अल्ताफ
अल्ताफ मनगुळी हा पत्नी आणि मुलांसह विजयपूर शहरातील मुझावर गल्ली परिसरात राहत होता. गांधीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीसह विविध गुन्ह्यांप्रकरणी त्याच्यावर आरोप असल्याचे सांगण्यात येते. तो दररोज रात्री मित्रांसोबत घराबाहेर जात असे, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
काल रात्रीही तो घराबाहेर गेला होता. तो कोणासोबत गेला होता, बाहेर जाण्यामागील कारण काय होते आणि त्याची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याचा सखोल तपास करावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
या हत्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मृताच्या कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या