प्रतिष्ठा न्यूज / दीपक शिंत्रे
विजयपूर : शेतीयोग्य जमिनीवर रिअल इस्टेट व्यवसायाचा वाढता प्रभाव पाहता भविष्यात अन्नधान्य उत्पादनासाठी जमिनीची उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे. अशा काळात ज्याच्याकडे शेतजमीन असेल, तोच खऱ्या अर्थाने राजा बनेल. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी शेतकऱ्यांनी आपली जमीन विकू नये, असे आवाहन सिद्धनकोळ मठाचे शिवकुमार महास्वामी यांनी केले.
जिल्ह्यातील कोल्हार येथे आगमन झाल्यानंतर माजी मंत्री एस. के. बेल्लुब्बी यांच्या कुटुंबीयांनी महास्वामींचा सन्मान केला. यावेळी उपस्थित भक्तसमुदायाला मार्गदर्शन करताना त्यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले.
शेतकऱ्यांनी व्यावसायिक पिकांसोबतच नागरिकांच्या गरजांसाठी आवश्यक असलेल्या अन्नधान्याचे उत्पादन घेण्याकडेही लक्ष द्यावे. तरुणांनी केवळ आयटी-बीटी उद्योग आणि नोकरीच्या मागे न लागता शेतीक्षेत्रात सहभागी होऊन कृषी विकासाला हातभार लावावा, असेही त्यांनी सांगितले.
आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा
आपल्याला जन्म देणारे आई-वडील हेच खरे देव आहेत. त्यामुळे त्यांच्या चरणांची पूजा करून त्यांचा आदर केला पाहिजे. आपण भक्तांच्या घरी गेल्यानंतर स्वतःची गुरू म्हणून पादपूजा करून घेत नाही. त्याऐवजी त्या घरातील आई-वडील व ज्येष्ठांची त्यांच्या मुलांकडून पादपूजा करून घेतो. मुलांमध्ये संस्कार रुजविणे, ज्येष्ठांचा आदर करण्याची परंपरा जोपासणे हेच गुरूंचे खरे ध्येय असले पाहिजे, असे प्रतिपादन शिवकुमार महास्वामी यांनी केले.
देशाच्या भविष्याबाबत बोलताना त्यांनी कुटुंबव्यवस्था आणि संततीविषयक आपले विचारही व्यक्त केले. भारतमातेचे संरक्षण आणि हिंदू समाजाच्या अस्तित्वासाठी नवविवाहित दाम्पत्यांना अधिक संततीसाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी मंत्री एस. के. बेल्लुब्बी, चिन्नप्पा गिड्डप्पगोळ, संगप्पा हुच्चप्पगोळ, आनंद बिष्टगोंड, कुमारगौड पाटील, अमरय्या हिरेमठ, शिवानंद ताळिकोटी, सिद्धय्या हुविन हिप्परगी, बी. एन. हिरेमठ, चंद्रशेखर बेल्लुब्बी, श्रीशैल गिड्डप्पगोळ, सिद्धू मुरनाळ, रमेश कंटी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या