संग्रामपूर प्रतिनिधी : पत्रकारितेच्या कामासाठी माहिती घेण्याकरिता संपर्क साधलेल्या पत्रकाराला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रकाश अवचार यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी पत्रकार रवींद्र शिरसकर यांच्या लेखी तक्रारीवरून तामगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र संबंधितांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी संग्रामपूर तालुक्यातील पत्रकार बांधवांकडून करण्यात येत आहे.
खासदारांच्या दौऱ्याशी संबंधित वृत्ताची माहिती घेताना कथित प्रकार
तक्रारीत नमूद केल्यानुसार, काँग्रेसचे राज्यसभा खासदार मुकुल वासनिक हे १० ऑक्टोबर २०२६ रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या भेटीदरम्यान काजू-बदामाच्या प्लेटसंदर्भातील छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. या घटनेची पार्श्वभूमी जाणून घेऊन वस्तुस्थितीची खातरजमा करण्यासाठी पत्रकार रवींद्र शिरसकर यांनी ११ ऑक्टोबर रोजी प्रकाश अवचार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.
यावेळी अवचार यांनी आपल्याला अश्लील व अपमानास्पद भाषेत शिवीगाळ केली. तसेच, “साले पत्रकार... रिकामचोट धंदे करता का? तुला पाहून घेतो...” अशा शब्दांत धमकी दिली. आपल्यासह इतर पत्रकार बांधवांना जीवे मारण्याची आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप शिरसकर यांनी लेखी तक्रारीत केला आहे.
पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाईची मागणी
या घटनेबाबत पत्रकार रवींद्र शिरसकर यांनी संबंधितांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पत्रकारांना लोकहिताच्या विषयांवर प्रश्न विचारण्याचा, राजकीय घडामोडींची माहिती घेण्याचा आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याचा अधिकार आहे. अशा कामादरम्यान धमकी व शिवीगाळ झाल्याचे आरोप समोर आल्याने पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भारतीय न्याय संहितेतील कलमांन्वये अदखलपात्र नोंद
उपलब्ध पोलीस कागदपत्रानुसार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी संग्रामपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३५१(२) आणि ३५२ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आता या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाईची मागणी पुढे आली आहे.
पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता यावे आणि त्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित तक्रारींची कायदेशीर प्रक्रियेनुसार दखल घेतली जावी, अशी मागणी पत्रकार बांधवांकडून होत आहे.
कारवाई न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार!
पत्रकाराला “साले पत्रकार” असे संबोधून अवमानित करणे, शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे हा गंभीर प्रकार असल्याचा आरोप पत्रकार बांधवांनी केला आहे. काँग्रेसचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रकाश अवचार यांच्याविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे. या प्रकरणात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकार संघटनांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या