तासगाव : मराठा आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी तसेच मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविण्यासाठी तासगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता तासगाव येथील एस.टी. स्टँड चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत तासगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन आंदोलनाची पूर्वकल्पना देण्यात आली.
हे आंदोलन पूर्णपणे शांततेच्या, लोकशाही व सनदशीर मार्गाने करण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान सार्वजनिक अथवा खासगी मालमत्तेचे कोणतेही नुकसान होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली.
रुग्णवाहिका, अग्निशामक दल, शाळकरी मुले तसेच इतर अत्यावश्यक सेवांना आंदोलनामुळे अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात येणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना तातडीने मार्ग उपलब्ध करून दिला जाईल, असेही आयोजकांनी सांगितले.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आवश्यक ती कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी अरुण साळुंखे, अक्षय पाटील, प्रदीप माने-पाटील, अमोल शिंदे, अमोल कदम, खंडू कदम, बाबुराव जाधव, शरद शेळके, सचिन चव्हाण, रविकिरण जाधव, किरण जाधव, प्रदीप उर्फ लाला पाटील, डांगे, मनोज पाटील, पांडुरंग जाधव, सुनील लुगडे यांच्यासह सकल मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या