सांगली : समाजाला दिशा देणाऱ्या आणि भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी माहिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा महिला मोर्चा कुपवाड पूर्व मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा अस्मिता जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. म.न.पा. शाळा क्र. ३६, विवेकानंद सोसायटी, कुपवाड रोड येथे झालेल्या या कार्यक्रमात १७ गुरुजनांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यात आली.
या कार्यक्रमास भाजपा सांगली जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. स्वाती ताई सुशांत खाडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते १० अंगणवाडी शिक्षिका व सेविका तसेच महानगरपालिकेच्या ७ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छांसोबतच सन्मानित शिक्षकांना रोपे भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा आगळावेगळा संदेश देण्यात आला. ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या गुरुजनांचा गौरव आणि त्याचवेळी निसर्ग संवर्धनाचा संकल्प, अशा दुहेरी उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना सौ. स्वाती ताई सुशांत खाडे यांनी शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे नसून समाजाची वैचारिक व संस्कारक्षम पिढी घडविणारे शिल्पकार आहेत, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात, संस्कारक्षम समाजनिर्मितीत आणि राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिला मोर्चाच्या या उपक्रमातून ‘शिक्षकांचा सन्मान आणि पर्यावरणाची जपणूक’ असा विधायक संदेश समाजापर्यंत पोहोचला. कार्यक्रमास भाजपा महिला मोर्चा उपजिल्हाध्यक्षा सांगली शहर गंगूताई नाईक, कुपवाड पूर्व मंडल अध्यक्षा अस्मिता जाधव, महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच नागरिकांची उपस्थिती होती.
शिक्षक दिनानिमित्त गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या