सांगली प्रतिनिधी : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू सिंचन योजनांच्या पाणी नियोजनासह विविध प्रलंबित प्रश्नांवर माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. १६) वारणाली येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले. त्यानुसार विसापूर-पुनदी योजना १ डिसेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत संजयकाका पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे कृष्णा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून, कोयना धरणातून सध्या १ हजार ५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या योजना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी कोयना पायथा विद्युतगृहातील दुसरे युनिट सुरू करून नदीपात्रात एकूण २ हजार १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करणे आवश्यक आहे. यासंदर्भात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे संजयकाका पाटील यांनी बैठकीत सांगितले.
जिल्ह्यातील म्हैसाळ आणि ताकारी योजना सुरू झाल्या असून, या योजनांचे पाणी शेवटच्या टोकापासून म्हणजेच टेल टू हेड पद्धतीने देण्याच्या सूचना संजयकाका पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या. म्हैसाळ योजनेअंतर्गत जत तालुक्यातील दोडा नाला आणि होस्पेट येथील तलावांमध्ये पिण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
ताकारी योजनेचे पाणी गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी तालुक्यात पोहोचणार असून, या योजनेचे पाणीही टेल टू हेड पद्धतीने वितरित करण्यात येणार आहे. विसापूर-पुनदी योजना यापूर्वी १० डिसेंबर रोजी सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, तोपर्यंत तालुक्यातील २६ गावांमधील फळबागांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही योजना १ डिसेंबरपासून सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले.
तसेच मूळ टेंभू योजना १ डिसेंबरपासून सुरू करून तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतील घाटमाथ्यावरील भागाला, तसेच सिद्धेवाडी तलावात पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले. यातून सावळज परिसराला पाणी उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.
या बैठकीस जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता डवरी, मासाळ, गुरव, प्रज्ञा पाटील, मोहिते यांच्यासह तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतील लाभधारक शेतकरी उपस्थित होते.
या बैठकीतील निर्णयांमुळे जिल्ह्यातील सिंचन योजनांच्या पाणी वितरणाला गती मिळणार असून, फळबागा आणि पिकांना वेळेत पाणी मिळण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
पावसाळ्यात ज्यावेळी नदीतून भरपूर पाणी वाहत असते,, सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होते त्यावेळी सगळे लोक प्रतिनिधी हातावर हात बांधून आणि ओठ शिवून बसलेले असतात आणि डिसेंबर महिना आला की बैठकांचे सत्र सुरू करायचे, पाणी सोडण्याचे नियोजन झाले म्हणून ढिंडोरा पिटायचा.पब्लिक लगेच खुश आणि पब्लिसिटी पण होते. याला महाराष्ट्रात राजकारण म्हणतात.
उत्तर द्याहटवा