प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : स्व. मदनभाऊ पाटील स्मृती बुद्धिबळ महोत्सवाचे यंदा आठवे वर्ष असून, यानिमित्ताने रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी सांगलीत प्रथमच आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन पद्धतीने खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची माहिती आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजयकुमार माने आणि प्रायोजक तथा नगरसेवक संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केपीज् चेस अकॅडमी, सांगली यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ‘स्व. मदनभाऊ पाटील स्मृती आंतरराष्ट्रीय खुली जलद फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा २०२६’ जैन कच्छी भवन, सांगली येथे होणार आहे. सकाळी ८ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यंदाच्या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन पद्धतीने ही स्पर्धा घेतली जात आहे.
या स्पर्धेसाठी बुद्धिबळपटूंना एकूण १ लाख १०० रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय ४१० हून अधिक बक्षिसे, ३४० पेक्षा अधिक चषक, ७० हून अधिक पदके आणि १०० पेक्षा जास्त रोख पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
विविध वयोगट आणि श्रेणींतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. खुल्या गटासाठी २५, रेटिंग गटासाठी ७५, इतर राज्यांतील खेळाडूंसाठी २५, विशेष क्षमता गटासाठी ५, महिला गटासाठी ५, तर ७ ते १६ वर्षांपर्यंतच्या विविध वयोगटांसाठी तब्बल १५० पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय ५० वर्षांवरील ज्येष्ठ खेळाडू, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट बुद्धिबळ अकॅडमी तसेच जिल्हानिहाय सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंसाठीही स्वतंत्र पारितोषिके दिली जाणार आहेत.
सांगलीच्या बुद्धिबळ क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पारितोषिकांचे वितरण होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नवोदितांसह अनुभवी बुद्धिबळपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची आणि आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना (AICF) आणि महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना (MCA) यांचे नोंदणीकरण आवश्यक असून, प्रवेश शुल्क केवळ ३९९ रुपये ठेवण्यात आले आहे.
नगरसेवक संतोष पाटील यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, केपीज् चेस अकॅडमीच्या माध्यमातून संपूर्ण नियोजन केले जात आहे. जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देशभरातील बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय मानांकन मिळविण्याच्या या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्पर्धा डायरेक्टर संतोष पाटील यांनी केले आहे.
संपर्क : ८३९००१८३०८, ७५८८८४२६०५, ९०४९०४०१४४.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या