प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:येथील शालिनी हॉल याठिकाणी लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने आयोजित दिवाळी फराळ व संवाद कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री,सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष बापू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आमदार देशमुख यांनी सामाजिक व सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला.सहकार क्षेत्रातील संधी व आव्हाने,संस्थांची सामाजिक बांधिलकी तसेच सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये सहकाराची भूमिका याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली.पतसंस्थेचे संचालक प्रा. विठ्ठल ढेकळे यांनी प्रास्ताविक करत संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.शाखेचे सल्लागार प्रा. बाळासाहेब मोरे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आप्पा भोसले यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.लोकमंगल बँक,सांगोला शाखेचे शाखाधिकारी शिवाजी दरेकर यांनी शासनाच्या विविध कर्ज योजना तसेच बँकेमार्फत उपलब्ध असलेल्या कर्ज योजनांची माहिती उपस्थितांना दिली.गरजू नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक ॲड.गजानन भाकरे, सचिन नाडगौडा,शाखेचे सल्लागार, ठेवीदार,कर्जदार, हितचिंतक,विविध वित्तीय संस्थांचे विभागीय अधिकारी,शाखाधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिवाळीच्या स्नेहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमातून संस्थेचे पदाधिकारी, सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ झाले. स्नेहाचा फराळ, विचारांचा संवाद आणि सहकाराच्या प्रगतीचा संकल्प अशा त्रिवेणी संगमामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ चव्हाण यांनी केले,तर आभार प्रा.एम.डी.पाटील यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या