सांगली : सांगलीतील टिंबर एरिया परिसरातील दांडेकर कंपाउंड येथे असलेल्या गणेश फर्निचर या फर्मच्या गोडाऊनला सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमधील लाखो रुपयांचे लाकडी फर्निचर, कच्चा माल तसेच परिसरात उभे असलेले एक मालवाहू वाहन जळून पूर्णपणे खाक झाले. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग अधिक पसरून मोठी दुर्घटना टळली.
टिंबर एरिया परिसरातील दांडेकर कंपाउंड येथे गणेश फर्निचरचे गोडाऊन आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास या गोडाऊनला अचानक आग लागली. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर, तयार साहित्य आणि कच्चा माल साठवून ठेवण्यात आला होता. त्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.
आगीची झळ शेजारील तळमजला आणि तीन मजली इमारतीपर्यंत पोहोचल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. घटनेची माहिती मिळताच सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.
गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी साहित्य असल्याने आग विझविण्यात अग्निशमन जवानांना मोठी कसरत करावी लागली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले. त्यामुळे आग शेजारील इमारतींमध्ये पसरण्याचा धोका टळला.
या दुर्घटनेत गोडाऊनमधील लाखो रुपयांचे तयार फर्निचर, लाकडी साहित्य, कच्चा माल आणि एक मालवाहू वाहन जळून खाक झाले. आगीमुळे नेमके किती आर्थिक नुकसान झाले, याचा तपशील समजू शकलेला नाही. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या