प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : दुष्काळसदृश परिस्थिती आणि पाणीटंचाईमुळे अडचणीत सापडलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.आमदार रोहित पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केलेल्या आग्रही मागणीची दखल घेत शासनाने ताकारी व म्हैसाळ सिंचन योजना १५ नोव्हेंबरपासून, तर टेंभू सिंचन योजना १ डिसेंबर २०२६ पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून,उभ्या पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात २९ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार रोहित पाटील यांनी तालुक्यातील सिंचन आणि पाणीटंचाईचा प्रश्न प्रभावीपणे मांडला होता.कमी पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती, द्राक्षबागांसह अन्य उभ्या पिकांना भेडसावणारी पाणीटंचाई आणि आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता सिंचन योजनांची आवर्तने तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली होती.तासगाव-कवठेमहांकाळ तालुका द्राक्ष उत्पादनासाठी राज्यात ओळखला जातो.सध्या द्राक्षबागांच्या छाटणीचा हंगाम सुरू असून,बागांच्या जोमदार वाढीसाठी नियमित पाणीपुरवठा आवश्यक आहे.मात्र,यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना वेळेत पाणी उपलब्ध न झाल्यास द्राक्षबागांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार रोहित पाटील यांनी बैठकीत सिंचनासाठी पाणी सोडण्याबाबत ठोस भूमिका मांडली होती.
धरणांमधील उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर करून त्याचा लाभ गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली होती. धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत असताना शेतकऱ्यांच्या मागणीनंतरही सिंचनासाठी पाणी सोडण्यास विलंब का,असा सवाल उपस्थित करत पाण्याचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचला पाहिजे,अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती.
ताकारी,म्हैसाळ,आरफळ आणि टेंभू या सिंचन योजनांच्या माध्यमातून शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याबरोबरच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचेही योग्य नियोजन करण्याची मागणी त्यांनी केली होती.दुष्काळी परिस्थितीत शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजांचा समतोल राखून आवर्तनांचे नियोजन करण्यावरही त्यांनी भर दिला होता.आता शासनाने ताकारी व म्हैसाळ योजनांचे आवर्तन १५ नोव्हेंबरपासून, तर टेंभू योजनेचे आवर्तन १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आवर्तनामुळे द्राक्षबागांसह अन्य उभ्या पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याच्या नियोजनालाही बळ मिळणार आहे.
मागणीला यश; आता प्रत्यक्ष पाण्याची प्रतीक्षा!*
शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नावर केवळ आश्वासनांपुरते न थांबता प्रत्यक्ष निर्णय व्हावा,यासाठी आमदार रोहित पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सातत्याने आग्रही भूमिका मांडली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत शासनाने सिंचन योजनांच्या आवर्तनाबाबत निर्णय घेतल्याने त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.आता जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सिंचनाचे पाणी वेळेत आणि पुरेशा प्रमाणात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी जलसंपदा विभागावर असणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या