सांगली प्रतिनिधी : चित्रपटसृष्टीत अभिनयाची संधी मिळवून आपली ओळख निर्माण करणाऱ्या तासगावच्या सौरभ गुजले याने आता थेट प्रसिद्ध गायक मिका सिंग यांच्या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्याची संधी मिळवली आहे. ‘धमाल ४’ या चित्रपटातील कामानंतर सौरभने मारलेली ही झेप सांगली जिल्ह्याच्या कलाक्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरत आहे.
सौरभ हा सांगली जिल्ह्यातील तासगावचा रहिवासी आहे. ‘धमाल ४’ या चित्रपटात काम करण्याची संधी त्याला मिळाली होती. या चित्रपटातील त्याच्या कामाची दखल घेत असोसिएट डायरेक्टर अमित सिंग राजपूत यांनी त्याला मिका सिंग यांच्या ‘बंगला’ या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्याची संधी दिली. त्यामुळे चित्रपटानंतर थेट संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकारांसोबत पडद्यावर झळकण्याची संधी त्याला मिळाली आहे.
कुकी गुलाटी फिल्म्स प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या गाण्याची निर्मिती करण्यात आली असून, कुकी गुलाटी यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. प्रसिद्ध गायक मिका सिंग आणि ॲडी गिल यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. ‘धमाल ४’चे असोसिएट डायरेक्टर अमित सिंग राजपूत यांनीच या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे.
या म्युझिक व्हिडिओमध्ये सौरभसोबत अंकिता कुकरेती, अर्पित आणि रॉनी चौहान हे कलाकारही झळकले आहेत. या गाण्याचा संपूर्ण व्हिडिओ IVY Moviebox Music या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे.
तासगावसारख्या शहरातून पुढे येत चित्रपट आणि संगीत क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सौरभला मिळालेली ही संधी उल्लेखनीय आहे. ‘धमाल ४’नंतर थेट मिका सिंग यांच्या गाण्यात झळकण्याची संधी मिळाल्याने त्याच्या कलाप्रवासाला नवी दिशा मिळाली आहे. त्याच्या या यशाचे सांगली जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या