प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा अधिकच चिघळला असून, साखर कारखानदारांनी जाहीर केलेल्या अल्प दराविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ऊस दराच्या संदर्भात पुढील आंदोलनाची रणनीती आणि ठोस भूमिका ठरवण्यासाठी आज पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कारखानदारांच्या शेतकरीविरोधी धोरणाचा तीव्र निषेध करण्यात आला असून, आगामी सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.
एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात ४२०० रूपये दर जाहीर झालेला असताना. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी चालू हंगामासाठी ऊसाची पहिली उचल प्रतिटन केवळ ३,००० रुपये जाहीर केली आहे. वाढलेली महागाई, खते, औषधे, मजुरी आणि तोडणी-वाहतुकीचा खर्च पाहता हा दर अत्यंत अपुरा असून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करणारा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला कारखानदार म्हणून मिरवणारे आणि सरकारला लुबाडणारे जिल्ह्यातील आमदार व खासदार उपस्थित राहिले नाहीत. या लोकप्रतिनिधींनी बैठकीला पाठ फिरवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमधील उद्रेक आणि संताप आज पंढरपूर येथील बैठकीत स्पष्टपणे दिसून आला.
यावर्षी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि साखरेचा किमान विक्री दर (MSP) वाढवण्यासाठी शेतकरी संघटनांचा लढा सुरू होता. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी केवळ दुष्काळाचे कारण पुढे करत नेहमीपेक्षा एक महिना आधीच कारखाने घाईघाईने चालू केले. कारखानदारांच्या या भूमिकेमुळे साखरेच्या दरासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला कमकुवत करण्याचा प्रयत्न झाला असून, जिल्ह्यातील कारखानदारांनी साखर उद्योगाचे पूर्णपणे वाटोळे लावल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
बैठकीत कारखानदारांच्या आणखी एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश करण्यात आला. चालू वर्षी सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदारांनी प्रति क्विंटल ४,२०० ते ४,३०० रुपये दराने साखरेचे आगाऊ करार केले आहेत. या करारांच्या माध्यमातून कारखानदारांनी व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची उचल आधीच घेतली आहे. साखरेला बाजारात इतका चांगला भाव मिळत असताना आणि स्वतः पैसे उचलले असतानाही शेतकऱ्यांना मात्र पहिली उचल केवळ ३,००० रुपये देऊन लुटले जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार मोठ्या प्रमाणात काटामारी व रिकव्हरी चोरी करून लुट करत आहेत व कारखानदारांचा हा नफेखोरपणा आणि शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक आता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. १६ नोव्हेंबरच्या मोर्चात जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी सहभागी होऊन प्रशासनाला आणि कारखानदारांना जाब विचारणार आहेत.त्याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा आल्यानंतर त्यादिवशी प्रश्न निकाली नाही लागला तर त्याच ठिकाणी राजू शेट्टी पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे सांगितल्यामुळे पोलिस प्रशासन व राज्य सरकार समोर पेच निर्माण झाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या