कोल्हापूर (प्रतिनिधी) : डिजिटल युगात मोबाईल आणि समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव असताना नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करून वाचनसंस्कृती जोपासणे ही काळाची गरज आहे. पुस्तक माणसाला विचार करायला शिकवते, विवेकाची जाणीव करून देते आणि समाजपरिवर्तनासाठी वैचारिक बळ देते. त्यामुळे व्यक्तींच्या सन्मानासाठी पुस्तकांची भेट देण्याचा उपक्रम समाजाच्या वैचारिक समृद्धीला चालना देणारा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. प्रकाश मोरे यांनी केले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सखाराम शिवा जाधव यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व परिवर्तनवादी कार्याचा गौरव करण्यासाठी मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने नागाळा पार्क येथील बालाजी लॉनमध्ये जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी जाधव यांना सन्मानचिन्ह आणि ७५ हजार रुपये किमतीची पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले. या अनोख्या पुस्तकभेटीच्या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
यावेळी प्रकाशक, निर्माते व दिग्दर्शक अनिल म्हमाने म्हणाले, आजच्या नव्या पिढीमध्ये पुस्तकांविषयी आवड निर्माण करणे आवश्यक आहे. वाढदिवस, विवाह सोहळे आणि अन्य कौटुंबिक समारंभांमध्ये महागड्या भेटवस्तूंऐवजी पुस्तके भेट देण्याची संस्कृती विकसित झाली पाहिजे. पुस्तके ही केवळ भेटवस्तू नसून पुढील पिढ्यांसाठी ज्ञानाचा आणि विचारांचा अनमोल ठेवा आहेत.
सत्काराला उत्तर देताना सखाराम जाधव म्हणाले, मी आयुष्यभर प्रागतिक, परिवर्तनवादी तसेच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कास धरून सामाजिक कार्य केले. त्या कार्याची दखल घेऊन झालेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे.
यावेळी मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर, ॲड. अतुल जाधव, विशाल जाधव, काका लोखंडे, दिलीप खुडे, आम आदमी पक्षाचे अभिजीत कांबळे, सिद्धार्थ जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रकाश वांद्रे यांनी केले, तर आभार ॲड. सचिन आवळे यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या