सांगली, दि. 7: मेरा युवा भारत सांगली व विश्वासराव नाईक कला वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालय शिराळा येथे विकसित भारत युवा संवाद-आपले मत जाणून घ्या कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख, मेरा युवा भारत सांगलीचे उपसंचालक राहुल डोंगरे, परमपूज्य स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्थेचे सचिव विश्वप्रतापसिंग नाईक, शिराळा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, युथ आयकॉन डॉ. लावण्या राव, प्राचार्य डॉ. राजेंद्र बनसोडे उपस्थित होते.
तरुणांमध्ये लोकशाही मूल्याविषयी जागरूकता निर्माण करणे, मतदानाचे महत्व पटवून देणे तसेच लोकशाही प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढवणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या प्रक्रियेमुळे देशाची व्यवस्था अधिक भक्कम आणि पारदर्शक होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले. यावेळी त्यांनी युवकांशी संवाद साधताना केंद्र सरकारच्या संबंधित विविध उपक्रमांची माहिती दिली. युवकांनी सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नांबाबत सजग राहावे, चांगल्या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार सत्यजित देशमुख यांनी भारताची जागतिक स्तरावर बदलत असलेली प्रतिमा, देशाची वाढती आर्थिक क्षमता आणि केंद्र सरकारच्या विविध विकासात्मक उपक्रमांची माहिती दिली. युवकांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून विकसित भारताच्या निर्मितीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी मेरा युवा भारत सांगली युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती देत लोकांनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन राहुल डोंगरे यांनी केले. त्यानंतर अंदमान-निकोबार येथून आलेल्या युथ आयकॉन डॉ. लावण्या राव यांनी युवकांशी संवाद साधला. त्यांनी मतदानाचे महत्व व मतदारांचे अधिकार व कर्तव्य तसेच लोकशाही प्रक्रियेत युवकांची भूमिका तिचे महत्त्व आणि मूलभूत हक्क यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी युवकांना माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले तसेच कोडच्या माध्यमातून सूचना व अभिप्राय नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली
नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांनी विद्यार्थ्याना विकसित भारत युवा संवाद कार्यक्रम बाबत माहिती दिली व महाविद्यालयाला हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार मानले.
या संवादादरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना मतदार जागृती, निवडणूक प्रक्रिया आणि विविध शासकीय उपक्रमांविषयी प्रश्न विचारले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांचे प्रबोधन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रिया आणि नागरिक म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांची माहिती मिळाली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमात लोकशाही शपथ घेण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र बनसोडे, नगरसेवक अवधुत गायकवाड, उपप्राचार्य बी. आर. दशवंत, डॉ तानाजी हवालदार, सागर व्हनमाने, अनंत कुलकर्णी, महेंद्र साठे तसेच विविध स्तरांवरील पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. प्रमोद पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या संवादात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या