प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२७ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे.
बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत पार पडणार आहेत. तर दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार आहेत.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध
विद्यार्थ्यांना परीक्षांचे विषयवार सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकावरच विश्वास ठेवावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या