विजयपूर : कौटुंबिक किंवा वैयक्तिक मनस्तापातून कोल्हार पुलावरून कृष्णा नदीत उडी मारलेल्या तरुणाला मित्रांनी प्रसंगावधान राखून वाचविल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.
यंकप्पा संगप्पा मूलिमनी (वय 28, रा. ढवळेश्वर, ता. बीळगी, जि. बागलकोट) असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे.
मित्रांचा एक समूह बागलकोट येथे चित्रपट पाहून कोल्हार पुलावरून परतत असताना एका तरुणाने पुलावरून नदीत उडी मारल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ वाहन थांबवून बचावकार्य सुरू केले.
वाहनात असलेल्या दोरीच्या साहाय्याने नदीत बुडत असलेल्या तरुणाला बाहेर काढून त्याचे प्राण वाचविण्यात आले. त्यानंतर त्याला कोल्हार पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
प्रसंगावधान राखून तरुणाचे प्राण वाचविणाऱ्या विजय बाटी, प्रकाश मठपती, श्रीशैल चौडप्पनवर, उदय आलकोंडी आणि विनय मठपती या मित्रांच्या कार्याचे कोल्हार पोलीस ठाण्याचे अधिकारी अशोक नायक यांनी कौतुक केले.
मित्रांनी दाखविलेल्या धाडसामुळे एका तरुणाचे प्राण वाचले असून त्यांच्या या माणुसकीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या