सांगली प्रतिनिधी : महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील कृषी संशोधन केंद्रात सोयाबीन पिकावर उल्लेखनीय संशोधनकार्य करणारे डॉ. मिलिंद देशमुख यांना त्यांच्या उत्कृष्ट संशोधन योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय ‘SOFA Award 2025-26’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशामुळे सांगली जिल्ह्याच्या कृषी संशोधन क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डॉ. देशमुख यांनी सोयाबीन पिकाच्या संशोधनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या संशोधन कार्यातून विकसित झालेल्या ‘फुले संगम’, ‘फुले अग्रणी’ आणि ‘फुले दूर्वा’ या सोयाबीन वाणांच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रसारामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. तसेच सोयाबीन पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी उपयुक्त संशोधन आणि शेतकऱ्यांसाठी उत्पादनवाढीच्या शिफारशी विकसित करण्यामध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
केवळ सोयाबीनपुरते संशोधन मर्यादित न ठेवता भुईमूग, तीळ यांसह अन्य तेलबिया पिकांमध्ये अधिक उत्पादन देणारे वाण विकसित करण्याच्या संशोधन प्रक्रियेतही त्यांनी योगदान दिले आहे. कृषी क्षेत्रातील उत्पादनक्षमता वाढविणे, सुधारित वाणांचा प्रसार करणे आणि संशोधनाचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे या दृष्टीने त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे.
कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी म्हणून अल्पावधीतच त्यांनी केलेले कामही उल्लेखनीय आहे. संशोधन कार्यासोबतच केंद्राच्या कामकाजात त्यांनी दाखविलेली कार्यक्षमता आणि योगदान यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेतली जात आहे.
या संशोधन कार्याची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय ‘SOFA Award 2025-26’ देऊन गौरविण्यात आले. या सन्मानाबद्दल पद्मश्री डॉ. विखे पाटील कृषी परिषद, मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रतापसिंह मोहिते पाटील, ग्रीन गोल्ड सीड्स प्रा. लि., संभाजीनगरचे बायोटेक्नॉलॉजिस्ट डॉ. नितीन गोरडे, ‘इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोल पॅनल’चे उद्योजक राजेंद्रसिंह घोरपडे, चितळे उद्योग समूह, भिलवडीचे प्रशासकीय अधिकारी सूर्यकांत कटकोळ तसेच अन्य पदाधिकारी आणि कृषी शास्त्रज्ञांनी डॉ. देशमुख यांचा सन्मान करून अभिनंदन केले.
कृषी संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी योगदान देणाऱ्या डॉ. मिलिंद देशमुख यांना मिळालेला हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेणारा ठरला असून, त्यांच्या यशाबद्दल कृषी क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या