प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सांगलीच्या वतीने आयोजित सन २०२६ चा पुरस्कार वितरण समारंभ बुधवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी संजय भोकरे इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म मीडिया अँड आर्ट्स, शिवपॅव्हेलियन, राममंदिर चौक, सांगली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सांगलीच्या समृद्ध नाट्यपरंपरेचा गौरव करत नाट्य, अभिनय, तंत्रज्ञान, बालरंगभूमी आणि कलाक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना यावेळी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
प्रसिद्ध उद्योजक श्री. गिरीशजी चितळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास नाट्य परिषद शाखा सांगलीचे अध्यक्ष डॉ. भास्कर ताम्हनकर आणि कार्यवाह श्री. विशाल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते नटराजपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉ. भास्कर ताम्हनकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर सहकार्यवाह अपर्णा गोसावी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. ताम्हनकर यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना गिरीश चितळे यांनी सांगलीच्या समृद्ध नाट्यचळवळीचे कौतुक केले. सांगलीला लाभलेल्या नाट्यपरंपरेचा इतिहास केवळ अभिमानाने मिरवण्यापुरता मर्यादित न ठेवता, त्यातून प्रेरणा आणि बोध घेऊन उज्ज्वल भविष्यासाठी वर्तमानात नव्या वाटा शोधण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यानंतर प्रशांत गोखले यांनी पुरस्कारांचे वाचन केले. प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षांच्या हस्ते सन २०२६ चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये काकासाहेब खाडिलकर जीवन गौरव पुरस्कार आर्किटेक्ट विवेक देशपांडे यांना, आचार्य अत्रे प्रतिभारंग पुरस्कार मंगेश मंत्री यांना, अरुण पाटील नाट्यतंत्र पुरस्कार सुनील पाटील यांना, दिलीप परदेशी नाट्यरंग पुरस्कार वरुण जाधव यांना, नाना ताडे नाट्यस्वर पुरस्कार स्वरदा खाडीलकर यांना, श्रीनिवास शिंदंगी बालरंगभूमी पुरस्कार प्रीतम जोशी यांना प्रदान करण्यात आला. तसेच संस्था विशेष सन्मान पुरस्कार सांगली शिक्षण संस्था, सांगली यांना, तर डॉ. मधू आपटे कलावंत पुरस्कार प्रताप सोनाळे, हर्षाली बेलवलकर आणि इरफान मुजावर यांना देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कारार्थींच्या वतीने मंगेश मंत्री आणि विवेक देशपांडे यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. आचार्य अत्रे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद असल्याची भावना मंगेश मंत्री यांनी व्यक्त केली. तर विवेक देशपांडे यांनी आपल्या प्रदीर्घ कलात्मक कारकिर्दीचा आणि नाट्यप्रवासाचा आढावा घेतला.
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'चतुरंग अन्वय' या दिवाळी अंकाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या अंकाचे हे २४ वे वर्ष असून, आजवर या अंकाला २८ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यावेळी अंकाचे संपादक महेश कराडकर, व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी, ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य अविनाश सप्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालक सचिन पारेख यांनी केले, तर सूत्रसंचालन संचालक शशांक लिमये यांनी केले. या सोहळ्यास नाट्य परिषदेचे सर्व संचालक, नाट्यरसिक, कलावंत आणि नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगलीच्या नाट्यपरंपरेचा सन्मान, ज्येष्ठ व नव्या पिढीतील कलावंतांच्या योगदानाची दखल आणि नाट्यचळवळीला नवी दिशा देण्याचा संकल्प अशा त्रिवेणी संगमातून हा पुरस्कार वितरण सोहळा संस्मरणीय ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या