प्रतिष्ठा न्यूज
ईश्वरपूर : दोन मुली झाल्या, मात्र मुलगा झाला नाही, या कारणावरून मनात राग धरून पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या ईश्वरपूर येथील कौस्तुभ कृष्णराव सरनौबत याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पत्नीला पहाटे फिरायला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर घेऊन जाऊन विहिरीत ढकलून तिचा खून केल्यानंतर हा प्रकार अपघात असल्याचा बनाव करणाऱ्या आरोपीला अखेर न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायालयाच्या या निकालामुळे पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपीला कायद्याचा दणका बसला आहे.
या प्रकरणी फिर्यादी मिलिंद नानासो भोसले (वय २८, रा. न्यू पॅलेस, हेड पोस्ट ऑफिस, रमन मळा, कोल्हापूर) यांनी १८ सप्टेंबर २०२२ रोजी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कौस्तुभ सरनौबत याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७५/२०२२ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३०२, ४९८ (अ) आणि १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपीने पत्नीला पहाटे फिरायला जाण्याच्या बहाण्याने सोबत नेले आणि विहिरीत ढकलून तिचा खून केला. त्यानंतर पत्नीचा मृत्यू अपघातामुळे झाल्याचे भासवून पोलीस ठाण्यात खोटी माहिती दिली. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या कथित अपघातामागील हत्येचा कट उघडकीस आणला.
या गुन्ह्याचा तपास ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी केला. गुन्ह्यात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही त्यांनी परिस्थितीजन्य पुरावे संकलित करून आरोपीविरुद्ध ठोस पुरावा गोळा केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या कामात दप्तरी अंमलदार सहायक पोलीस फौजदार शरद जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण कानडे आणि प्रशांत देसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दहा साक्षीदारांच्या साक्षी ठरल्या महत्त्वाच्या
सदर खटला सेशन केस क्रमांक १२७/२०२२ अन्वये सत्र न्यायाधीश क्रमांक २, मा. आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात चालला. महाराष्ट्र शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. विशाल नरेंद्र बामणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी मिलिंद नानासो भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एन. राऊत आणि तपासी अधिकारी शशिकांत चव्हाण यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
विशेष सरकारी वकील अॅड. विशाल बामणे यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि समाजाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, असा प्रभावी युक्तिवाद न्यायालयात केला.
त्यावर दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी न्यायालयाने आरोपी कौस्तुभ कृष्णराव सरनौबत याला भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड सुनावला. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, तसेच कलम १७७ अन्वये सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
या खटल्याच्या कामकाजासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक मुद्दसर सादिक शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
कोर्ट पैरवी अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद जाधव, पोलीस हवालदार उत्तम शिंदे तसेच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पैरवी कर्मचारी पोलीस नाईक प्रमोद जालिंदर आपटे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप शेटे यांनी सरकारी पक्षाला सहकार्य केले.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणातील निकालामुळे गंभीर गुन्ह्यांच्या तपासात सक्षम पुरावे आणि प्रभावी न्यायालयीन पाठपुरावा किती महत्त्वाचा असतो, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या