प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. 4 : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘विकसित भारत युवा संसद २०२६’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा सांगली येथे उत्साहात संपन्न झाली. भारती भवन, राजवाडा चौक, सांगली येथे झालेल्या या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, मेरा युवा भारत सांगलीचे उपसंचालक राहुल डोंगरे, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रुरल डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन सांगलीच्या प्राचार्य पल्लवी जमसंडीकर, न्यू लॉ कॉलेजच्या प्राचार्य पूजा नरवाडकर आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार विशाल पाटील यांनी युवकांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, देशाच्या विकासासाठी विधायक विचार मांडावेत आणि सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांबाबत जागरूक राहावे, असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी युवकांच्या वैचारिक जडणघडणीसाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. युवकांनी आपले विचार आत्मविश्वासाने मांडून देशाच्या विकास प्रक्रियेत योगदान द्यावे, असे मत व्यक्त केले.
मेरा युवा भारत सांगली चे उपसंचालक राहुल डोंगरे यांनी युवा संसद उपक्रमाची संकल्पना व उद्देश स्पष्ट करत युवकांना अशा व्यासपीठांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
या स्पर्धेचा मुख्य विषय ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ हा होता. या विषयाच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत आपले विचार प्रभावीपणे मांडले. प्रत्येक स्पर्धकाला तीन मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे, देशाच्या राजकीय व सामाजिक घडामोडींबाबत जागरूकता वाढविणे, तसेच विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचा संदेश देण्यात आला.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक राधिका उदय पेंडसे, द्वितीय क्रमांक प्रतिमा प्रकाश कोळी, तृतीय क्रमांक मारिया रिजवान अहमद चमनशेख यांनी मिळवला. या स्पर्धेतील जिल्हास्तरीय तीन विजेत्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार असून राज्यस्तरीय अव्वल तीन विजेत्यांना नवी दिल्ली येथील संसद भवनात राष्ट्रीय स्तरावर आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. सहभागी सर्व युवक-युवतींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. जया कुरेकर,संजय ठिगळे, अविनाश कोळी,गोरखनाथ किर्दत,प्रशांत पाटील यांनी काम पाहिले.
कार्यक्रमामुळे सांगली जिल्ह्यातील युवकांना राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर आपले विचार मांडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले. युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सूत्रसंचालन विना नायर, मृण्मयी सावंत यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेरा युवा भारत सांगली चे सागर व्हनमाने, महेंद्र साठे, प्रा.डेकस्टर उडवर्ड,कविता पारिख, त्रिशा जैन,चेतना लोंढे यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या