प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 4 : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत प्रकरणांवर केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतला. त्या प्रसंगी ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणे, पोलीस विभागाकडील व न्यायालयात प्रलंबित प्रकरणे व सद्यस्थिती, जातीच्या दाखल्याची प्रलंबित प्रकरणे, समाज कल्याण विभागाकडे प्राप्त प्रकरणे, अत्याचार पीडितांना नुकसान भरपाई आदि प्रकरणांचा आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रलंबित प्रकरणे, मागील इतिवृत्त, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे आदिंबाबत सविस्तर आढावा समितीस सादर केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या