प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या सामाजिक, आर्थिक व लोकसंख्याशास्त्रीय विकासाचे नियोजन करण्यासाठी महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया असून, तिच्या द्वितीय टप्प्यातील लोकसंख्या गणना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामीण तासगाव प्रशासन सज्ज झाले आहे.लोकसंख्या गणनेच्या अनुषंगाने नागरिकांना १० ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत स्वयं-गणना (Self Enumeration) सुविधेद्वारे आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन नोंदविता येणार आहे. त्यानंतर २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत प्रगणक घरोघरी भेट देऊन कुटुंबातील सदस्यांची माहिती संकलित करणार आहेत. २८ फेब्रुवारी रोजी रात्री बेघर व्यक्तींची गणना करण्यात येणार आहे. हे वेळापत्रक शासनाच्या अंतिम अधिसूचनेनुसार निश्चित राहणार आहे.जनगणना प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार असून, माहिती संकलनासाठी मोबाईल अॅप्लिकेशन व डिजिटल व्यवस्थापन प्रणालीचा वापर केला जाणार आहे. यासाठी प्रगणक, पर्यवेक्षक, क्षेत्रीय प्रशिक्षक तसेच संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून अचूक माहिती संकलित करण्याबरोबरच विशेष गणना क्षेत्रे आणि बेघर व्यक्तींच्या गणनेकडे प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे. नागरिकांनी स्वयं-गणना सुविधेचा लाभ घ्यावा तसेच घरोघरी येणाऱ्या प्रगणकांना अचूक व संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.जनगणनेदरम्यान नागरिकांकडून संकलित करण्यात येणारी वैयक्तिक माहिती कायद्यानुसार गोपनीय ठेवण्यात येते. जनगणनेतून प्राप्त होणारी आकडेवारी देशाच्या भावी विकासाचे नियोजन, शासकीय योजनांची आखणी आणि संसाधनांचे योग्य वितरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.जनगणना २०२७ हे राष्ट्रीय महत्त्वाचे कार्य यशस्वी करण्यासाठी ग्रामीण तासगाव क्षेत्रातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या