सांगली प्रतिनिधी : रांगोळी कलेच्या माध्यमातून तब्बल २७ विश्वविक्रमांची नोंद करणारे, महाराष्ट्र शासनाच्या आदर्श कला शिक्षक पुरस्काराने सन्मानित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कलेचा ठसा उमटवणारे विश्वविख्यात रांगोळीकार व चित्रकार प्रा. आदम अली मुजावर यांच्या व्यक्तिचित्रांचे भव्य प्रदर्शन सांगलीत आयोजित करण्यात आले आहे. अनाथ व गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी सामाजिक बांधिलकीतून साकारलेला हा अनोखा उपक्रम १२ ते १६ नोव्हेंबर २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत एस.टी. स्टँड रोडवरील मराठा समाज हॉल, सांगली येथे संपन्न होणार आहे. या प्रदर्शनातून मिळणारा संपूर्ण निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी खर्च करण्यात येणार आहे.
प्रा. आदम अली मुजावर हे सध्या अजितराव घोरपडे विद्यालय, कळंबी येथे कार्यरत असून त्यांनी ए.टी.डी., जी.डी. आर्ट, ए.एम. आणि डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन असे कलाशिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या तीन दशकांपासून रांगोळी या भारतीय लोककलेचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कलेची दखल जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून त्यांना १०० हून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. २७ विश्वविक्रमांची नोंद हा त्यांच्या कलाप्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे.
रांगोळी ही केवळ अंगण सजविण्याची कला नसून तिच्या माध्यमातून भव्य व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे आणि सांस्कृतिक विषय साकारता येतात, हे त्यांनी आपल्या प्रयोगशीलतेतून जगासमोर सिद्ध केले. डिसेंबर २००२ मध्ये महाभारतातील भगवान श्रीकृष्ण-अर्जुन यांचा गीता उपदेश हा विषय निवडून त्यांनी तब्बल २,००० चौरस फुटांवर सलग ७२ तास एकट्याने रांगोळी साकारली. या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. रांगोळीच्या माध्यमातून भव्य व्यक्तिचित्र साकारण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित करणारे ते पहिले कलाकार ठरले. त्यानंतरही त्यांनी विविध विषयांवरील रांगोळ्यांच्या माध्यमातून अनेक विश्वविक्रम प्रस्थापित केले.
त्यांच्या या अतुलनीय कलात्मक योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने २०१७ मध्ये त्यांना आदर्श कला शिक्षक राज्य पुरस्काराने सन्मानित केले. रांगोळी कलेला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्याबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचे कार्यही ते सातत्याने करत आहेत.
पाच वर्षांच्या मेहनतीतून साकारली व्यक्तिचित्रांची अनोखी कलादालन
कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जग ठप्प झाले असताना प्रा. मुजावर यांनी आपले कलात्मक कार्य थांबवले नाही. २०२० मधील लॉकडाऊनच्या नऊ महिन्यांच्या काळात त्यांनी अनेक महामानवांची व्यक्तिचित्रे पेंटिंगच्या माध्यमातून साकारली. या कलाकृतींतून मिळालेल्या निधीपैकी ५१ हजार रुपये त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये कोरोना मदतीसाठी दिले. संकटाच्या काळात कलेच्या माध्यमातून सामाजिक दायित्व जपण्याचा हा त्यांचा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.
याच अनुभवातून प्रेरणा घेत त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून कॅनव्हासवरील तैलचित्रांच्या निर्मितीवर विशेष लक्ष केंद्रित केले. सांगली जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची व्यक्तिचित्रे त्यांनी अत्यंत बारकाईने साकारली आहेत. याच कलाकृतींचा संग्रह आता सांगलीकरांसाठी प्रदर्शनाच्या माध्यमातून खुला होणार आहे.
या प्रदर्शनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार जयंत पाटील, सुमित कदम, सुधीर गाडगीळ, इद्रिसभाई नाईकवाडी, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, सुहास बाबर, पृथ्वीराज पाटील, रोहित पाटील, विक्रम सावंत यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांतील मान्यवरांची व्यक्तिचित्रे पाहायला मिळणार आहेत.
तसेच मुख्याध्यापक डी. एन. पाटील, उद्योजक सी. आर. सांगलीकर, आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, मोहन वनखंडे, प्रवीण शेठ लुंकड, डॉ. रियाज मुजावर, रामचंद्र वाघमोडे, अमोल बाबर, अशोकराव शिंदे, दिनेश जाधव, तात्यासाहेब खोत, एस. आर. बापू पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची चित्रेही या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहेत.
चेहऱ्यावरील भाव, स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाचे रंगांतून दर्शन
या व्यक्तिचित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ चेहऱ्याचे साम्य साधण्यापेक्षा संबंधित व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, विचार, कार्य आणि चेहऱ्यावरील भाव टिपण्याचा केलेला प्रयत्न. प्रत्येक चित्रासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागला असून कॅनव्हास आणि तैलरंगांचा वापर करून ही चित्रे साकारण्यात आली आहेत. छायाप्रकाशाचा सूक्ष्म वापर, रंगसंगती, चेहऱ्यावरील भाव, वेशभूषा आणि व्यक्तिमत्त्वातील बारकावे यांचा सखोल अभ्यास करून चित्रांना त्रिमितीय स्वरूप देण्यात आले आहे.
राजकीय व्यक्तिमत्त्वांची चित्रे ही केवळ चेहऱ्यांची प्रतिकृती नसून त्यांच्या सार्वजनिक जीवनप्रवासाची, विचारांची, संघर्षाची आणि कार्याची दृश्य नोंद असते. कलाकाराच्या कुंचल्यातून आकार घेताना प्रत्येक व्यक्तिचित्र एक वेगळी कहाणी सांगते. त्यामुळे हे प्रदर्शन केवळ चित्रांचे प्रदर्शन न राहता कला, समाज आणि व्यक्तिमत्त्वांचा अनोखा संगम ठरणार आहे.
ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना कलेची दिशा
प्रा. मुजावर यांचे कार्य केवळ स्वतःच्या कलात्मक यशापुरते मर्यादित राहिलेले नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कलेचे योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि कला हे रोजगाराचे साधन बनावे, यासाठी ते गेली अनेक वर्षे विनामूल्य मार्गदर्शन करत आहेत. कार्यशाळा, प्रात्यक्षिक वर्ग, व्याख्याने आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना कला प्रवाहात आणले आहे.
चित्रकला, रांगोळी, अक्षरलेखन, हस्तकला, क्लॉथ पेंटिंग, ग्लास पेंटिंग, कार्व्हिंग, मातीकाम, कागदकाम आणि कॅनव्हास पेंटिंग अशा विविध कलाप्रकारांचे प्रशिक्षण ते विद्यार्थ्यांना देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजितराव घोरपडे विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळवली आहेत. ग्रामीण भागातील कलाकारांनी स्पर्धेच्या युगात सक्षमपणे उभे राहावे आणि कलेतून स्वावलंबी व्हावे, हा त्यांच्या कार्यामागील मुख्य उद्देश आहे.
'पैसा माणसाला जगवतो, पण कला माणसाला जगायला शिकवते!'
या प्रदर्शनामागील भावना व्यक्त करताना प्रा. आदम अली मुजावर म्हणतात, "पैसा हा माणसाला जगवतो; पण कला माणसाला जगायला शिकवते, याची अनुभूती मला आयुष्यात वेळोवेळी आली आहे. गेली तीन दशके मी रांगोळी लोककलेच्या जतन आणि संवर्धनासाठी काम करत आहे. कलेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन आणि समाजोपयोगी कार्य करण्याचा माझा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. कोरोना काळातही कलेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करता आली. त्याच भावनेतून आता गेल्या पाच वर्षांपासून मेहनतीने साकारलेली व्यक्तिचित्रे प्रदर्शनात मांडत आहे. या प्रदर्शनातून मिळणारा संपूर्ण निधी अनाथ व गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी वापरण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कलेचा उपयोग व्हावा, हीच या उपक्रमामागची खरी प्रेरणा आहे."
एका छोट्याशा ग्रामीण भागातून सुरू झालेला कलाप्रवास जागतिक स्तरावर पोहोचवताना सामाजिक बांधिलकीची जाणीव कायम जपणाऱ्या प्रा. आदम अली मुजावर यांचे हे प्रदर्शन सांगलीकरांसाठी कलात्मक मेजवानी ठरणार आहे. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याची संधीही या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कलारसिक, सामाजिक संस्था, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन या विधायक उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या