सांगली प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून श्रीराम प्रतिष्ठान सांगली व ॲब्सोल्युट फिटनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी सामूहिक चंद्रनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सांगली परिसरातील सुमारे ८० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आरोग्य आणि व्यायामाचा संदेश दिला.
महिलांचे आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्य यांविषयी जागरूकता निर्माण करणे, महिलांमध्ये व्यायामाची आवड वाढविणे तसेच निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात आयोजित करण्यात आलेल्या या सामूहिक चंद्रनमस्कार उपक्रमामुळे परिसरात उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. सहभागी महिलांनी एकत्रितपणे चंद्रनमस्कार करून शारीरिक व्यायामासोबतच सामूहिक सहभाग आणि आरोग्यजागृतीचा आदर्श निर्माण केला.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांनी आपल्या आरोग्यासाठी वेळ देणे अत्यंत गरजेचे आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांनी स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्यावे, व्यायामाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवावे आणि निरोगी समाजनिर्मितीस हातभार लावावा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
महिलांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आयोजकांचा उत्साह वाढविणारा ठरला. भविष्यातही महिलांच्या आरोग्यविषयक जागरूकतेसाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी ॲब्सोल्युट फिटनेस सेंटरच्या सौ. अर्चना कुलकर्णी, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व महिला सहभागी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या